मुंबई (वृत्तसंस्था) दोन लाखांपर्यंत ज्यांचे पीक कर्ज आहे, ते पूर्णपणे माफ होणार असून त्याच्या सातबारावरून ही पीककर्ज काढून टाकले जाणार आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा शब्द मी दिला असून दिलेल्या शब्दाप्रमाणे येत्या मार्च महिन्यापासून ही योजना सुरू करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. ‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्राचे कार्यकारी संपादक, खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या दीर्घ मुलाखतीच्या दुसऱ्या भागात मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते.
मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले की, दोन लाखांपेक्षा वर असलेल्या कर्जदारांसाठी आणि विशेषत: जे नियमित कर्ज फेडत आहेत अशांसाठी लवकरच योजना जाहीर करून ती अंमलात आणली जाईल अशी घोषणाही उद्धव ठाकरे यांनी केली आहे. या योजना कार्यान्वित करत असताना राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेऊनच या योजना तयार करण्यात येणार आहेत. कर्जमाफी हा प्रथमोपचार असून शेतकरी त्याच्या पायावर कसा उभा राहील यासाठी आपला प्रयत्न असला पाहिजे,असेही मुख्यमंत्री म्हणाले.