जळगाव प्रतिनिधी । विविध मागण्यांसाठी जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक संघातर्फे जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
शिक्षकांनी एका निवेदनाद्वारे आपल्या मागण्या सादर केल्या. यात २० टक्के अनुदान पात्र राज्यातील सर्व शाळांना/ वर्ग तुकड्यांना त्या पुढील टप्पा अनुदान विनाअट मंजूर करावे. निकष पात्र विनाअनुदानित शाळा/ वर्ग तुकड्यांना सरसकट अनुदान मंजूर करावे. अंशदायी पेंशन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना सर्वांना लागू करावी. राज्यातील शिक्षकांना वरीष्ठ व निवडश्रेणी लागू करण्याबाबत २३ ऑक्टोंबर २०१७ चा जाचक शासन निर्णय रद्द करावा. सर्व अतिरक्त शिक्षकांचे पूर्वीप्रमाणे जिल्ह्यांतर्गतच त्वरीत समायोजन करणे तसेच समायोजन न झालेल्या शिक्षकास नियमित वेतन अदा करावे. शिक्षकेतर कर्मचार्यांचा सुधारीत आकृतीबंध लागू करावा. शिक्षक व शिक्षकतेर कर्मचार्यांची रिक्त पदे तातडीने भरावीत. शालार्थ आयडीची प्रकरणे त्वरित मंजूर करावी. शिक्षकांच्या सर्व प्रशिक्षकास टी.ए. व डी.ए. देण्यात यावा. सर्व अर्धवेळ ग्रंथपालांना पूर्णवेळ ग्रंथपाल म्हणून मान्यता द्यावी. दहावी व बारावी परीक्षेच्या उत्तर पत्रिका तपासणीसह काम करणार्या सर्व घटकांच्या मानधनात वाढ करावी. सहावीत ते आठवीच्या वर्गांना शिकवणार्या सर्व प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांना हायस्कूल शिक्षकाची वेतनश्रेणी मंजूर करावी. राज्यातील पालिका, नगरपंचायत, महापालिका क्षेत्रातील शिक्षण संस्थांच्या खासगी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या इमारतीवरील कर माफ करावा, आदी २३ मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहे.
या वेळी जिल्हा परिषदेचे शिक्षण विस्तार अधिकारी किशोर वायकोळे, बी. डी. धाडी, शिक्षण उपनिरीक्षक राजधर माळी, अधीक्षक वानखेडे यांनी संघटनेचे निवेदन स्वीकारले. सूत्रसंचालन टीडीएफचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य शरदकुमार बन्सी यांनी केले. या प्रसंगी बी. डी. महाले, धरणगाव तालुका अध्यक्ष सी. के. पाटील, विभागाचे उपाध्यक्ष सी. सी. वाणी, जिल्हा उपाध्यक्ष साधना लोखंडे, एम. डी. शिंपी, डी. ए. पाटील, पतपेढीचे संचालक मनोहर सूर्यवंशी, अजय देशमुख, आर. बी. चौधरी, रवींद्र रणदिवे, तालुका पतपेढीचे संचालक एस. बी. घुगे आदी उपस्थित होते.