नवी दिल्ली : वृत्तसंस्था । पहिल्याच दिवशी मोदींनी मंत्रीमंडळातील नवीन सहकाऱ्यांना काही सल्ले दिले आहेत. यामध्ये मोदींनी प्रसारमाध्यमांशी जास्त बोलू नका असंही सांगितल्याची माहिती समोर आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात बुधवारी ४३ मंत्र्यांनी शपथ घेतली. या मंत्रीमंडळ विस्तारानंतर आजपासूनच पंतप्रधानांनी नवीन मंत्र्यांसोबत काम करण्यास सुरुवात केली आहे.
बुधवारी शपथ घेतलेल्या ४३ मंत्र्यांपैकी ३६ मंत्र्यांचा पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश करण्यात आलाय., १५ कॅबिनेट मंत्री, तर २८ राज्यमंत्री आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळातील पहिले सहकारमंत्रीपद अमित शहा यांच्याकडे देण्यात आले असून, त्यांच्याकडील गृहमंत्रीपदाची जबाबदारीही कायम ठेवण्यात आली आहे. गुजरातचे मनसुख मंडाविया हे नवे आरोग्यमंत्री असतील तर, माजी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान नवे शिक्षण मंत्री आहेत. कालच्या शपथविधीनंतर आज लगेचच मोदी २.० टीमने आपलं काम सुरु केलं. पंतप्रधान मोदींनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासहीत आज देशातील वेगवेगळ्या आयआयटीच्या संचालकांशी चर्चा केली.
जवळजवळ सर्वच नवीन मंत्र्यांनी आपला पदभार स्वीकारला असून मोदींनी या सर्वांना सूचना करताना १५ ऑगस्टपर्यंत दिल्लीमध्ये थांबून आपल्या मंत्रालयाचं काम समजून घ्यावं असं सांगितल्याची माहिती समोर आली आहे. पदभार स्वीकारल्याच्या दिवशीच मोदींनी मंत्रालयाचं कामकाज लवकर सुरु करावं अशा सुचना नवीन सहकाऱ्यांना दिल्या आहेत. त्याचबरोबर प्रसारमाध्यमांशी जास्त बोलू नका असा सल्लाही मोदींनी या नवीन मंत्र्यांना दिल्याचं समजतं.
नव्या रचनेत मोदींच्या मंत्रिमंडळात आता ७७ मंत्री आहेत. त्यातील ७३ भाजप व उर्वरित ४ मंत्री अपना दल, जनता दल (सं), लोक जनशक्ती व रिपब्लिकन पक्ष या घटक पक्षांचे आहेत. मोदींचे नवे मंत्रिमंडळ पूर्वीच्या तुलनेत अधिक तरुण असून महिला, ओबीसी, अनुसूचित जाती-जमाती, जाट, मराठा समाजाला प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून उत्तर प्रदेशला सर्वाधिक ७ तर, महाराष्ट्राला ४ नवी मंत्रिपदे देण्यात आली आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात २५ राज्यांना प्रतिनिधित्व मिळाले आहे.
सहा केंद्रीय मंत्र्यांसह १२ मंत्र्यांना वगळण्यात आले असले तरी, संरक्षण, गृह, अर्थ व परराष्ट्र खात्यांच्या प्रमुख चार मंत्र्यांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आरोग्य, शिक्षण, माहिती-तंत्रज्ञान, माहिती-प्रसारण, विधि, सामाजिक न्याय, रसायने व खते, नागरी पुरवठा, अवजड उद्योग, दूरसंचार, पर्यावरण, कामगार कल्याण अशा किमान १२ मंत्रालयांसाठी नवे केंद्रीय तसेच, राज्यमंत्री नियुक्त केले जातील.