माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हां तृणमूल काँग्रेसमध्ये

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । एकेकाळी भाजपाच्या कोअर ग्रुपमध्ये गणले जाणारे ज्येष्ठ नेते राहिलेले यशवंत सिन्हा यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

 

पश्चिम बंगालसह एकूण ५ राज्यांच्या निवडणुका पुढील महिन्यात होणार आहेत. मात्र, सर्वाधिक राजकीय घडामोडी सध्याच्या घडीला पश्चिम बंगालमध्येच होताना दिसत आहेत. गेल्या तीन दिवसांत एकापाठोपाठ आधी तृणमूल, मग भाजपा आणि नंतर काँग्रेस अशा तिन्ही प्रमुख पक्षांनी आपल्या स्टार कॅम्पेनर्सची यादी जाहीर करून महिन्याभरात प्रचाराचा रणसंग्राम कसा रंगणार आहे याचीच झलक दाखवली.  वयाच्या ८३व्या वर्षी यशवंत सिन्हा यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे नेमकी यामागे तृणमूल काँग्रेसची काय चाल आहे? याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

 

एकेकाळी भाजपाच्या थिंक टँकमध्ये यशवंत सिन्हा यांचा समावेश होता. मात्र, पक्षासोबत झालेल्या पराकोटीच्या मतभेदांमुळे यशवंत सिन्हा यांनी २०१८मध्ये भाजपाला रामराम ठोकला. पण त्यांचा मुलगा जयंत सिन्हा मात्र अजूनही भाजपाकडून कार्यरत असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पहिल्या टर्ममध्ये ते हवाई वाहतूक राज्यमंत्री देखील होते.

 

 

 

भाजपाला रामराम ठोकल्यापासून यशवंत सिन्हा राजकीय जीवनापासून विलग झाले होते. मात्र आता पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांच्या ऐन महिनाभर आधी त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करून चर्चेची राळ उडवून दिली आहे. तृणमूल काँग्रेसमधील महत्त्वाचे नेते सुवेंदू अधिकारी यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी गेल्या काही दिवसांमध्ये भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे राजकीय अडचणीत सापडलेल्या तृणमूल काँग्रेसला यशवंत सिन्हा यांच्या पक्षप्रवेशामुळे किती फायदा होईल? याविषयी तर्क-वितर्क लढवले जाऊ लागले आहेत.

 

यशवंत सिन्हा हे मूळचे बिहारचे आहेत. १९६०मध्ये त्यांची भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये निवड झाली. आपल्या २४ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये देखील अनेक महत्त्वाच्या पोस्टवर काम केलं. १९८४मध्ये त्यांनी राजीनामा देऊन जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि ते राजकारणात सक्रीय झाले. १९८८मध्ये पक्षाकडून त्यांना राज्यसभेवर देखील पाठवण्यात आलं. माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या काळात यशवंत सिन्हा यांनी केंद्रीय अर्थमंत्रीपदाची धुरा सांभाळली आहे. त्यांच्याच काळात म्हणजे १९९०-९१मध्ये भारताच्या प्रख्यात खासगीकरण, जागतिकीकरण धोरणाची बिजं रोवली गेली.

 

१९९६मध्ये यशवंत सिन्हा भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते झाले. पुन्हा वाजपेयी सरकारमध्ये १९९८मध्ये त्यांच्यावर अर्थमंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली. २००२मध्ये ते देशाचे परराष्ट्रमंत्री देखील राहिले आहेत. २००९मध्ये त्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पुढची १० वर्ष यशवंत सिन्हा पक्षात कार्यरत होते, मात्र, त्यांना फारशी मोठी जबाबदारी सोपवली गेली नाही. मधल्या काळात त्यांनी अनेकदा जाहीरपणे पक्षविरोधी भूमिका देखील घेतल्या. अखेर २०१८मध्ये त्यांनी भाजपाला रामराम ठोकला. त्यावेळी देशातली लोकशाही धोक्यात आली आहे, असं त्यांनी केलेलं विधान बरंच गाजलं होतं.

Protected Content