पुणे : वृत्तसंस्था । कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि त्यांच्या महिला सहकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी ८ जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
पुण्यातील ८ जणांवर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश आहेत. हर्षवर्धन जाधव यांना अमन चड्डा आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.
न्यायालयाने मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यावर त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. पुण्यातील चतुःश्रुंगी पोलीस ठाण्यात हर्षवर्धन जाधवांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हर्षवर्धन जाधवांना जामीन मिळण्यात अडचणी आल्या होत्या. मात्र आता हर्षवर्धन जाधवांना मारहाण करणाऱ्यांनाही हा वाद भोवण्याची शक्यता आहे.
हर्षवर्धन जाधव यांनी किरकोळ अपघाताच्या वादातून एका दुचाकीस्वाराला मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल झाला होता. मात्र, जाधव यांच्याकडून अटक टाळण्यासाठी छातीत दुखत असल्याचं कारण १५ डिसेंबरला सांगण्यात आलं होतं. पुणे पोलिसांनी हर्षवर्धन जाधव यांची ससूनमध्ये तपासणी करुन त्यांना रिसतर अटक केली होती.
अमन अजय चड्डा यांच्या तक्रारीवरुन हर्षवर्धन जाधव आणि त्यांच्या सहकारी इशा झा या दोघांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. पुण्यातील चतुःश्रुंगी पोलीस तपास करत आहेत. अमन चड्डा यांनी आपल्या तक्रारीत त्यांचे आई वडील जखमी झाल्याचं म्हटलं आहे.
“पुण्यातील औंध भागातून माझे आईवडील दुचाकीवरुन जात असताना हर्षवर्धन जाधव यांनी अचानक आपल्या गाडीचा दरवाजा उघडल्याने त्यांचा अपघात झाला. या अपघातात आई गंभीर जखमी झाली. वडिलांची नुकतीच अँजिओप्लास्टी आणि ओपन हार्ट ऑपरेशन झाली होती. हे सांगूनही हर्षवर्धन जाधव यांनी त्यांच्या छातीवर बुक्क्या आणि लाथांनी मारहाण केली. त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.” असे अमन चड्डांनी तक्रारीत म्हटले होते
“हर्षवर्धन जाधव यांच्यासोबत असलेली महिला इषा झा यांनीही जाधव यांच्यासोबत संगनमत करुन शिवीगाळ करत हाताने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. वडिलांच्या पोटामध्ये आणि छातीवर लाथाबुक्क्या मारल्या. आईलाही ढकलून दिलं. आईच्या पायावर लाथ मारुन तिला ढकलून दिले. यामुळे तिच्या पायालाही गंभीर दुखापत केली,” असंही या तक्रारीत म्हटलं होतं.