धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मागील भांडणाच्या कारणावरून एका दाम्पत्याला तीन जणांकडून शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना धरणगाव तालुक्यातील बोरखेडा येथे घडली आहे. याप्रकरणी गुरूवार १६ मार्च रोजी दुपारी २ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धरणगाव पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील बोरखेडा येथे अरूण गंगाधर पाटील (वय-५८) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मागील भांडणाच्या कारणावरून ४ मार्च रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास ते घरी असतांना गावात राहणारे बाळू सुभाष पाटील, रूखमाबाई सुभाष पाटील आणि पिंटू सुभाष पाटील यांनी अरूण पाटील यांना शिवीगाळ करून मारहाण केली. भांडण सोडविण्यासाठी अरूण पाटील यांची पत्नी आली असता त्यांना देखील मारहाण व शिवीगाळ केली. तर दोघांना जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर अरूण पाटील यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुरूवार १६ मार्च रोजी दुपारी २ वाजता संशयित आरोपी बाळू सुभाष पाटील, रूखमाबाई सुभाष पाटील आणि पिंटू सुभाष पाटील तिघं राहणार बोरखेडा ता. धरणगाव यांच्या विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ मोती पवार करीत आहे.