जळगाव प्रतिनिधी । मागील भांडणाच्या कारणावरून पतिपत्नीस चार जणांनी लाकडी दांडक्याने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना तालुक्यातील असोदा येथे घडली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशाबाई अरुण सोनवणे (वय-४५) रा. धनजीनगर आसोदा ता. जि. जळगाव या आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांचे पती अरुण सोनू सोनवणे हे घरी असताना गल्लीतील धनराज भालेराव, आशा भालेराव, अक्का भालेराव आणि किरण भालेराव (सर्व रा. असोदा ता.जि. जळगाव) यांनी मागील भांडणाच्या कारणावरून शुक्रवार २१ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास हातातील लाकडी दांडक्याने पाठीवर व डोक्यावर मारहाण करून दुखापत केली. तसेच इतरांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये चौघांनी पती-पत्नीला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या घटनेप्रकरणी आशाबाई सोनवणे यांनी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून त्यांच्या तक्रारीवरून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक विलास शिंदे करीत आहेत.