महिलेचे फोटोवरून बापलेकाला बेदम मारहाण

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महिलेचे फोटो मोबाईलमध्ये असल्याच्या कारणावरून मुलासह त्याच्या वडीलांना बेदम मारहाण केल्याची घटना किनगाव येथे शनिवारी २८ मे रोजी रात्री घडली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

यावल पोलीसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, यावल तालुक्यातील किनगाव येथील रहिवाशी उमेश भगवान धनगर कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतो. शेतीच्या कामासाठी त्याच्याकडे महिला मजूर कामासाठी येत असतात. दरम्यान, २८ मे रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास सुरेश हरचंद भोई, अमोल बापु साळूंके, बादल वसंत हरणे, रोहीत उर्फ गोलु दिलीप साळुंके, राहुल बापु साळुंके, विजय उर्फ नाना मधुकर साळुंके सर्व रा. किनगाव ता. यावल हे उमेश धनगर याच्याकडे आले आणि विचारणा केली की, हळदीच्या कार्यक्रमातील महिलेचे फोटो तुझ्या कडे कसे आले, त्यावर उमेश म्हणाला की, हा माझा मोबाईल नाही माझ्या पत्नीचा आहे, मी तिला

विचारेल. परंतू या उत्तरावर समाधान न मानता उमेश धनगर याला सर्वांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. त्यानंतर उमेशला मारहाण होत असल्याचे पाहून त्याचे वडील भगवान धनगर तेथे धावून आले. त्यांना देखील सहा जणांनी लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली. दोघांना यावल ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रकरणी उमेश धनगर यांच्या फिर्यादीवरून  सुरेश हरचंद भोई, अमोल बापु साळूंके, बादल वसंत हरणे, रोहीत उर्फ गोलु दिलीप साळुंके, राहुल बापु साळुंके, विजय उर्फ नाना मधुकर साळुंके यांच्या विरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार अजीज शेख, हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे.

Protected Content