जळगाव प्रतिनिधी । जिल्हा न्यायालयातील सरकारी वकिल अॅड. राखी उर्फ विद्या भरत राजपूर (पाटील) यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी समोर आली आहे.
भुसावळ तालुक्यातील बेलखेड येथील सासर व बोहर्डे ता. भुसावळ येथील माहेर असलेल्या अॅड. वकील विद्या पाटील या पती डॉ. भरत पाटील व दोन मुले पूर्वेश व सोनू यांच्यासह जामनेर शहरातील सुपारीबाग परिसरात वास्तव्यास आहेत. डॉ. भरत पाटील यांचा जामनेर येथे दवाखाना असून अॅड. विद्या पाटील या जळगाव जिल्हा न्यायालयात सरकारी वकिल म्हणून कार्यरत होत्या.
रविवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास विद्या हिचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची माहिती पती डॉ. भरत पाटील यांनी बोहर्डे येथील विद्या यांच्या माहेरकडील नातेवाईकांना दिली. तिचा मृतदेह भुसावळ येथे घेवून जात असल्याचे सांगितले. विद्या यांच्या चुलत नातेवाईकांनी भुसावळ शहरातील सर्व खाजगी दवाखाने बघितले. मात्र विद्या अथवा तिचा पती आढळून आला नाही. दुसर्या दिवशी परत डॉ. भरत याने मृतदेह बेलखेड येथे नेत असल्याचे सांगितले. त्यानुसार नातेवाईक बेलखेडे येथे पोहचले.
याठिकाणी तिच्या पतीसह सासरच्यांनी शवविच्छेदन करण्याची भूमिका घेतली. मात्र माहेरच्या नातेवाईकांनी शवविच्छेदनाशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही असा पावित्रा घेतला. त्यानुसार विद्या हिचा मृतदेह वरणगाव येथील सरकारी रुग्णालयात हलविण्यात आला. तेथून जिल्हा सरकारी रुग्णालयात मृतदेह आणण्यात आला. जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. यादरम्यान त्यांच्या तोंडावर, गळ्यावर तसेच कपाळावर जखमा आढळून आल्या आहेत. त्यामुळे मारहाणीत मृत्यू झाल्याचा पोलिसांना संशय आहे. सायंकाळी ६ वाजता बेलखेड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. जिल्हा रुग्णालयातून जामनेर पोलिसांनी अॅड. विद्या पाटील यांचे पती डॉ. भरत पाटील यांना ताब्यात घेतले आहे.