जळगाव (प्रतिनिधी) येत्या सोमवारी (3 ऑगस्ट रोजी) रक्षाबंधन हा सण असल्याने महाराष्ट्र पोस्टल सर्कलने रविवार 2 ऑगस्ट, 2020 रोजी सर्व वितरण पोस्ट कार्यालयांमध्ये राखी टपालाची विशेष वितरण व्यवस्था केली आहे. दरवर्षी राखी टपाल हाताळण्यासाठी टपाल विभाग विशेष काळजी घेतो. यावर्षीदेखील राखी टपाल सेवा महाराष्ट्र राज्य पोस्टल सर्कलमधील पोस्ट ऑफिसवर बुक करावेत. असे आवाहन पु. बा. सेलूकर, अधीक्षक डाकघर, जळगाव डाक विभाग, जळगाव यांनी केले आहे.
राखी टपालाची प्राधान्यक्रमानुसार बुकिंग प्रक्रिया आणि वितरणाची विशेष व्यवस्था महाराष्ट्रातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये करण्यात आली आहे. राखी टपालाच्या वेगवान प्रक्रियेसाठी राखी टपाल सेंटर, मुंबई व नवी मुंबई येथेही सुरु करण्यात आली आहे. कोविड काळात शहरात राहणा-या भावांना विविध निर्बंधांमुळे रक्षाबंधन सणासाठी बहिणीची भेट घेता येणार नाही. अथवा अनेक भाऊ-बहिणी कन्टेंमेंट झोन किंवा प्रतिबंधात्मक इमारतींमध्ये राहत असतील. ही बाब लक्षात घेऊन पोस्ट विभागाने राखी टपालाचे संकलन व वितरण याला सर्वात जास्त प्राधान्य दिले आहे. त्याचबरोबर या काळात स्पीड पोस्ट सेवेचाही नागरीक वापर करु शकतील. असेही अधीक्षक डाकघर, जळगाव डाक विभाग पु. बा. सेलूकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.