जळगाव । शहरात सध्या सुरू असलेल्या महामार्ग चौपदरीकरण कामाचा आढावा घेण्यासाठी खासदार उन्मेष पाटील यांनी रविवारी अजिंठा विश्रामगृहावर बैठक घेतली. या बैठकीत रेल्वे व गिरणा पुलासह नऊ किलोमीटरच्या महमार्गासाठी नव्याने डीपीआर करण्याचे निर्देश त्यांनी अधिकार्यांना दिले.
खासदार उन्मेष पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला आमदार सुरेश भोळे, महापौर भारती सोनवणे, स्थायी समिती सभापती अॅड. शुचिता हाडा, गटनेते भगत बालाणी, नगरसेवक कैलास सोनवणे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा, आर्किटेक्ट शिरीष बर्वे, जांडू कंपनीचे अभियंता भूपेंद्र सिंग यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी खासदार उन्मेष पाटील यांनी सध्या संथ गतीने सुरू असणार्या कामाबद्दल अधिकार्यांना धारेवर धरले यावर्षी शहरातील १७ किलोमीटरसाठी ४५० कोटींचा डीपीआर तयार केला होता. प्राधिकरणाने तो रद्द करत थेट ८ किलोमीटरचा ७० कोटींचा डीपीआर तयार करून निविदा काढली. यात डीपीआरबाबत कोणालाही अजूनपर्यंत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे गोंधळ उडाला आहे. सुरू असलेल्या कामात सुधारणा कराव्या, नव्याने उर्वरित ९ किलोमीटरचा डीपीआर तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
दरम्यान, ७० कोटींच्या कामात १० टक्के निधी वाढवणे शक्य असून, त्या शिवकॉलनी आणि मिल्लतनगर येथे भुयारीमार्ग करण्यात येणार आहेत. ठेकेदाराने कामाचे विवरण असलेला फलक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या. बंद पडलेले भुयारी मार्गाचे काम तातडीने पूर्ण करण्याच्याही सूचना देण्यात आल्या. यानंतर खासदार उन्मेष पाटील यांनी आमदार, महापौर व महामार्ग प्राधिकरणार्याच्या अधिकार्यांसह प्रभात चौकातील अंडरपासच्या कामातील तांत्रीक बाबींची पाहणी केली.