जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावाजवळील महामार्गावरील टोल नाक्याजवळ पाळधी महामार्गा पोलीस ठाण्याच्या वतीने हेल्मेट न वापरणाऱ्या ४५ दुचाकीधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येवून हेल्मेट वापरण्याबात पथनाट्याद्वारे जनजागती करण्यात आली आहे, अशी माहिती पाळधी महामार्गाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या अपघातात मृत्यूचे प्रमाणे कमी होण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार दुचाकी धारकांना हेल्मेट वापरणे सक्तीचे केले आहे. या अनुषंगाने पाळधी महामार्गाचे पोलीस ठाण्याच्यावतीने मंगळवारी १६ मे रोजी सकाळी ११ वाजता जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावाजवळील महामार्ग टोलनाक्याजवळ विना हेल्मेट वाहनधारकांवर कारवाई केली आहे. ही कारवाई महामार्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली भर उन्हात अधिकारी व कर्मचारी यांनी उभे राहून एकुण ४५ वाहनधारकांवर हेल्मेट न घातल्याबाबत दंडात्मक कारवाई केली आहे. शिवाय यावेळी पथनाट्याद्वारे जनजागृती करून हेल्मेट वापरण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, जोपर्यंत अपघात होण्याचे प्रमाणे कमी होणार नाही तोपर्यंत ही कारवाई होतच राहिल असे देखील किरण बर्गे यांनी सांगितले. याप्रसंगी पोलीस अमलदार गुलाब मनोरे, किरण हिवराळे, अनिल सपकाळे, हितेश पाटील, दीपक पाटील, पवन देशमुख यांनी कारवाईसाठी परिश्रम घेतले.