जळगाव प्रतिनिधी । भुसावळकडून जळगावकडे येत असतांना समोरुन येणार्या भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार ज्ञानेश्वर रामचंद्र काकडे (३६, रा.वाघ नगर, मुळ रा.वंजारीखपाट, ता.धरणगाव) हे जागीच ठार झाल्याची घटना आज घडली.
राष्ट्रीय महामार्गावर खेडीनजीकच्या हॉटेल गौरव समोर हा अपघात झाला. अपघातानंतर पोलिसांनी अपघातग्रस्त दुचाकी तसेच ट्रकसह चालकाला ताब्यात घेतले असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर हा तरुण बांधकामावर टाईल्स कारागिर म्हणून काम करायचा. ज्ञानेश्वर सोमवारी भुसावळकडे गेला होता. तेथून परत येत असताना भुसावळकडे जात असलेल्या ट्रकने (क्र.डब्लु.बी.२३ ई.३२४८) समोरुन येणार्या ज्ञानेश्वरच्या दुचाकीला (क्र.एम.एच.१९ डी.ई.००७५) जोरदार धडक दिली. त्यात डोक्याला मार लागल्याने ज्ञानेश्वर याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात दुपारी तीनच्या सुमारास घडला. रस्त्यावरील लोकांनी ज्ञानेश्वर याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. दरम्यान,अपघाताचे वृत्त समजताच आई व बहिणीने जिल्हा रुग्णालयात प्रचंड आक्रोश केला.
दरम्यान, ज्ञानेश्वर याच्या पश्चात आई मनकर्णाबाई, पत्नी ज्योती, मुलगा साहू (५), मुलगी सोनाक्षी (८), भाऊ संतोष व बहिणी असा परिवार आहे. त्याच्या वडीलांचे वर्षभरापूर्वीच निधन झाले आहे. एमआयडीसी पोलिसांनी ट्रक चालकला ताब्यात घेतले आहे. हवालदार रतिलाल पवार यांनी पंचनामा केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.