महामार्गाच्या कामासाठी अवैध वाळूचा वापर ; ठेकेदाराला ३८ लाखांचा दंड

 

जळगाव प्रतिनिधी । औरंगाबाद ते जळगाव महामार्गाच्या कामासाठी  अवैध वाळूचा वापर केला म्हणून ठेकेदार कंपनीला ३८ लाखांचा दंड ठोठावण्याची कारवाई महसूल खात्याने केली आहे

 

भवानी फाटा, नेरी ते औरंगाबाद रोड बायपास या सुमारे 20 किलोमिटर अंतराच्या रस्ता कामासाठी अवैध वाळूचा वापर केल्याचा प्रकार उघडकीला आला होता. माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी महसुल विभागाकडे तक्रार केली होती.  चौकशीनंतर संबंधित सुनसगावच्या ठेकेदार कंपनीकडून पाचपट दंडात्मक रक्कम असा  एकुण 38 लाख 4 हजार रूपयांचा दंड वसूल करण्याचे आदेश  जारी करण्यात आले आहेत .

 

दीपककुमार गुप्ता यांच्या तक्रारीनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता  यांना  जिल्हा खनिकर्म विभागाच्या मदतीने या कामावरील वाळूसाठ्याचे मोजमाप करून अहवाल सादर करण्याची सुचना अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महाजन यांनी दिली होती.

 

3 जुलै 2020 रोजी या कामाची मोजणी केली असता 1005 ब्रास वाळूचा साठा आढळून आला. महसुल व बांधकाम विभागाच्या अधिकारी वर्गाच्या मदतीने दीपककुमार गुप्ता यांच्या समक्ष ठेकेदार कंपनीच्या सुनसगाव येथील साईटवर 1005 ब्रास वाळूसाठ्याचा पंचनामा करण्यात आला.

 

ठेकेदार कंपनीने प्रशासनाला खुलासा सादर केला होता . त्यानुसार कंपनीने 184 ब्रास वाळू बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथून उपसा केल्याचे सांगण्यात आले. बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हा खनिकर्म अधिकारी यांच्याकडे पडताळणी केली असता ही वाळूची उचल शेगाव ते बारामती व आळंदी येथे केल्याचे आढळून आले. जामनेर तालुक्यातील या ठेकेदार कंपनीची साईट असलेल्या सुनसगांव येथील कोणतीही पावती आढळून आली नाही. त्यामुळे सदर 184 ब्रास वाळूची वाहतुक अवैध उत्खननाच्या माध्यमातून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे जामनेरच्या  तहसीलदारांनी   जमिन महसूल कायद्यान्वेय दंडाची कारवाई  केली

 

184 ब्रास वाळूचे प्रति ब्रास बाजारमुल्य, रॉयल्टीची रक्कम तसेच पाचपट दंडात्मक रक्कम अशी एकुण 38 लाख 4 हजार 16 रुपये शासकीय तिजोरीत जमा करण्याचे आदेश जामनेरचे तहसीलदार  अरुण शेवाळे यांनी स्पायरोधारा जे. व्ही. कंस्ट्रक्शन लि.सुनसगाव   या ठेकेदार कंपनीस दिले आहेत.

 

Protected Content