जळगाव प्रतिनिधी । महाबळ परिसरातील ३८ वर्षीय तरूण डॉक्टराने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडीला आली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, डॉ. विद्याधर लिलाधर पाटील (३८) रा. ह. मू. महाबळ मूळ रा. साळवा नांदेड ता. धरणगाव येथे पत्नीसह वास्व्यास आहे. त्यांची पत्नी नागपूर येथे आरोग्य विभागात नोकरीस असल्याने ते घरी एकटेच राहत होते. डॉ. पाटील यांचा मोबाईल दोन दिवसांपासून बंद येत होता. तसेच त्यांच्या घराचा दरवाजा देखील बंद असल्याने नातेवाईकांनी त्यांच्या घरी जावून पाहणी केली असता पाटील यांनी छताला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी तात्काळ घटनेची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
डॉ. विद्याधर पाटील हे पुर्वी बीव्हीजेत नोकरीस होते. वर्षभरापूर्वी त्यांनी बदली शासकीय रुग्णालयात झाली असून ते १०८ क्रमांकाच्या रुग्णावाहिकेत डॉक्टर असल्याचे समजते. डॉ. पाटील यांनी आत्महत्या करण्याचे इतपत टोकाचा निर्णय का घेतला याबाबत अद्याप कळू शकले नाही. त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी असा परिवार आहे.