जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गोलाणी मार्केट विविध समस्यांच्या विळख्यात अडकले आहे. या मार्केटची नियमित स्वच्छता होत नसून येथील रिक्त असलेल्या गाळ्यांमध्ये अवैध धंदे वाढीस लागल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. यापार्श्वभूमीवर आज महापौर जयश्री महाजन यांनी मार्केटची पाहणी करून प्रशासनास योग्य त्या सूचना दिल्या.
आज गुरुवार दि. १४ जुलै रोजी महापौर जयश्री महाजन यांनी गोलाणी मार्केटला भेट देवून परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी तिसऱ्या व चौथ्या मजल्यावरील गाळ्यांची देखील पाहणी केली असता तेथे त्यांना रिक्त गाळ्यांचे दरवाजे तुटलेले व त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आढळून आली. त्यांनी मनपा अधिकाऱ्यांना नवीन दरवाजे बसविण्याची सूचना केल्यात. यावेळी त्यांच्या सोबत गोलाणी मार्केट मधील व्यावसायिक व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
गोलाणी मार्केट सुरक्षित राहिले नसल्याने येथे कायम पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात यावा अशी मागणी मंगला बारी यांनी केली. रिक्त गाळ्यांच्या सुरक्षेसाठी हे गाळे भाड्याने देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. गोलाणी मार्केटमध्ये संध्याकाळी अनुचित प्रकार घडत असतात यांना आळा घालण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. तसेच, मार्केटची स्वच्छता ही बचत गटामार्फत केली जाते. मात्र, या बचत गटाच्या महिलांना गाळेधारक हे वेळेवर पैसे देत नसल्याची तक्रार यावेळी करण्यात आली.
दरम्यान, मार्केटमध्ये यापुढे कोणत्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडू नये याकरिता रिक्त गाळ्यांना लोखंडी ग्रील बसविण्याच्या सूचना देत हे रिक्त गाळे भाडे तत्वावर देण्याचा विचार करण्यात येईल असे महापौर जयश्री महाजन यांनी स्पष्ट केले.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/782977346394735