महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना करणाऱ्यांना अटक करा

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील दीक्षितवाडी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे पुतळ्या हटविण्याचा प्रयत्न करत विटंबना केल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता, या गुन्ह्यातील संशयतांना अटक करावी, या मागणीसाठी विविध संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारी धरणे आंदोलन केले.

 

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील दीक्षित वाडी परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध या महापुरुषांची पुतळाची स्थापना गेल्या ३५ वर्षांपासून करण्यात आलेले आहे. दरम्यान ही जागा खाजगी असल्याने जागामालक यांनी जेसीबीच्या मदतीने पुतळा हटवण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान याच्या विरोधात समाज बांधवांनी तीव्र आंदोलन केले होते, तसेच जिल्हापेठ पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले होते. समाज बांधवांच्या मागणीनुसार जागामालक आणि इतर दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.  गुन्हा दाखल होऊन १५ दिवस झाले, परंतु अद्यापपर्यंत कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे संबंधितांवर अटक करावी या मागणीसाठी शनिवार १ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता सर्व विविध संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले. या आंदोलनात लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्ष प्रतिभा शिंदे, जनक्रांती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यासह सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content