जळगाव प्रतिनिधी । शहरातील गिरणा टाकी परिसरात नियमांचे उल्लंघन करणार्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या अतिक्रमण विरोधी पथकावर काही विक्रेत्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली.
याबाबत वृत्त असे की, शहरातील गिरणा टाकी व रिंगरोड परिसरात सायंकाळी पाच वाजेची वेळ उलटून गेल्यानंतरही विक्री करणारे भाजीपाला-फळे व किरकोळ वस्तूच्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. यात विविध विक्रेत्यांच्या गाड्या अतिक्रमण विरोधी पथकातर्फे जप्त करण्यात आल्या. उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक कारवाई करत असता गिरणा टाकीजवळच्या प्रभाग समिती कार्यालयाजवळ सर्व जण आले. येथे काही विक्रेत्यांनी पथकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यामुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली. या संदर्भात प्रस्तुत प्रतिनिधीने महापालिकेचे उपायुक्त संतोष वाहुळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या घटनेला दुजोरा दिला. या हल्ल्यात सुदैवाने कुणी जखमी झाले नसल्याची माहिती त्यांनी दिली.