जळगाव, प्रतिनिधी । महसूल विभागाचा अकृषक सारा सन २००१ पासून ते २०२१ पर्यंतचा १३ कोटींचा महापालिकेकडे थकबाकी असल्याने महापालिकेची बँक खाती गोठविण्यात यावीत असे आदेश महसूल विभागाने दिले असता आयुक्तांनी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून तोडगा कढण्याबाबत चर्चा केली असल्याची माहिती मुख्य लेखाधिकारी कपिल पवार यांनी दिली.
महापालिकेच्या किरकोळ वसुली विभागाकडे महसूल विभागाचा अकृषक सारा सन २००१ पासून थकबाकी आहे. याबाबत किरकोळ वसुली विभागाने आक्षेप नोंदविला आहे. आमच्याकडे एवढी थकबाकी नसल्याचा दावा किरकोळ वसुली विभागाने केला आहे. हा आक्षेप महसूल विभागाला कळविण्यात आला होता. दरम्यान, महसूल विभागाने बँकेला महापालिकेची खाती गोठविण्याचे आदेश दिले होते. यानुसार बँकेला पत्र देखील देण्यात आले होते. याबाबत लाईव्ह ट्रेंड्स न्यूजने महापालिकेचे मुख्य लेखाअधिकारी कपिल पवार यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, बँक खाती गोठविण्याबाबत पत्र आले असले तरी यावर तोडगा काढण्यासाठी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत व अपर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमीसे यांच्याशी चर्चा केली. समाधानकारक, साधकबाधक चर्चा झाल्याने सन्वयातून हा प्रश्न निकाली निघेल अशी अशा व्यक्त केली आहे.