महापालिका आयुक्तपदी सतीश कुलकर्णी रुजू

जळगाव प्रतिनिधी । येथील महापालिकेच्या आयुक्तपदी मुंबईच्या नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे उपसंचालक सतीश कुलकर्णी यांची नियुक्ती झाली असून त्यांनी आपला पदभार आज स्वीकारला.

मनपा आयुक्त डॉ. उदय टेकाळे सेवानिवृत्त झाल्यामुळे जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. यानंतर १२ फेब्रुवारी रोजी नागपूर येथील वस्त्रोद्योग महामंडळाच्या संचालिका आयएएस अधिकारी माधवी खोडे-चवरे यांची मनपा आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. मात्र त्या रुजू झाल्या नाहीत. मनपात आयुक्तांअभावी अनेक प्रश्‍न प्रलंबित राहत असल्याने तातडीने आयुक्तांची नियुक्ती करावी अशी मागणी आमदार राजूमामा भोळे यांनी विधानसभेत केली होती. त्यामुळे १३ मार्च रोजी मुंबईच्या नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे उपसंचालक सतीश कुलकर्णी यांची जळगाव मनपा आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांनी आज आयुक्तपदाचा सोमवारी स्वीकारला. यावेळी त्यांनी मनपातील सर्व विभाग आणि प्रमुखांची ओळख करून घेतली. त्यांनी महापौर यांनी घेतलेल्या कोरोना संदर्भात बैठकीस भेट देऊन माहिती जाणून घेतली. यानंतर ते जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांची भेट घेणार आहेत.

Protected Content