जळगाव/ यावल (प्रतिनिधी) महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत आज हिंगोणे (ता. यावल, जि. जळगाव), कराडी (ता. पारोळा, जि. जळगावर) येथे शेतकरी आधार प्रमाणिकरणाची चाचणी घेण्यात आली.
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत यावल तालुक्यातील हिंगोणे येथे पात्र लाभार्थ्यांची संख्या 138 असून 120 शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अद्ययावत करण्यात आली आहे. शुभारंभाच्यावेळी प्रमाणिकरण पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांची संख्या 42 एवढी आहे. आधार प्रमाणिकरणाच्या शुभारंभावेळी यावलचे सहाय्यक निबंधक किशोर पाटील, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विभागीय अधिकारी विनोद देशमुख, क्षेत्रीय अधिकारी पी. डी. पाटील, हिंगोणे विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे सचिव विजयसिंग पाटील उपस्थित होते. यावेळी वासुदेव सुधाकर वरके, लक्ष्मण हरी भोळे, सत्यभामा शलिक भालेराव यांना आधार प्रमाणिकरण प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
कराडी, ता. पारोळा येथेही आधार प्रमाणिकरण चाचणीचा कार्यक्रम झाला. तहसीलदार अनिल गवांदे, सहाय्यक निबंधक गुलाब पाटील, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विभागीय अधिकारी सुभाष पाटील, लेखापरीक्षक योगेश पाटील, विलास सोनवणे, सहकार अधिकारी सुनील पाटील, गटसचिव मधुकर संपत पाटील आदी उपस्थित होते. कराडी येथील 82 पात्र लाभार्थ्यांची माहिती अद्ययावत करण्यात आली आहे. यापैकी 10 शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया शुभारंभावेळी पूर्णत्वास आली आहे.
या योजनेंतर्गत जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 1 लाख 51 हजार 201 पात्र शेतकऱ्यांचे खाते आहेत. त्यापैकी पोर्टलवर अपलोड केलेल्या कर्ज खात्यांची संख्या 1 लाख 49 हजार 707 एवढी असून अपलोड केलेल्या कर्जखात्यांपैकी यशस्वीरित्या पोर्टलवर सबमिट झालेल्या कर्ज खात्यांची संख्या 1 लाख 49 हजार 707 असल्याची माहिती उपनिबंधक सहकारी संस्था श्री. मेघराज राठोड यांनी दिली. याशिवाय जिल्ह्यातील 2 लाख 10 हजार 677 शेतकऱ्यांचे कर्ज खाते आधार क्रमांकाशी संलग्न झाल्याची माहितीही त्यांनी दिली.
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या आधार प्रमाणिकरण चाचणीचा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी वेळोवेळी आढावा घेतला. त्यांनी सांगितले, या दोन गावातील आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया दोन दिवसात पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित यंत्रणेस दिल्या. तसेच त्यांनी सहकार विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी लोकप्रतिनिधी, शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.