महसूल विभागाच्या ‘उभारी ‘ उपक्रमात मंगळ ग्रह सेवा संस्थेचे भरीव योगदान

 

अमळनेर, प्रतिनिधी । येथील मंगळ ग्रह सेवा संस्थेने धार्मिक कार्यासोबतच सामाजिक जाणिवेचे उचित भान ठेवून महसूल विभागाच्या ‘ उभारी ‘ या उपक्रमात सर्वात भरीव योगदान दिले. त्यामुळे महसूल विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, खजिनदार गिरीश कुलकर्णी, सहसचिव दिलीप बहिरम यांना जळगाव येथील नियोजन सभागृहात समारंभपूर्वक सन्मानित केले.

प्रांताधिकारी सीमा अहिरे व तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्या आवाहना वरून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवांना मंगळ ग्रह सेवा संस्थेने चार छोट्या चक्क्या व चार शिलाई मशीन दिले.

यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे, महानगरपालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, महसूल उपायुक्त डॉ. अर्जुन चिखले, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी, उपविभागीय अधिकारी प्रसाद मते, कैलास कडलग, राजेंद्र कचरे, लक्ष्मीकांत साताळकर, विनय गोसावी, सीमा अहिरे, रामसिंग सुलाणे, उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे, राजेंद्र वाघ, तुकाराम हुलवळे तसेच जिल्ह्यातील सर्व तहसीलदार व विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

आयुक्त गमे म्हणाले की, आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबांच्या वारसांना शासकीय नियमाप्रमाणे आर्थिक मदत दिल्यानंतर प्रशासकीय जबाबदारी संपुष्टात येत असली, तरी सामाजिक जबाबदारी कायम राहते. या भावनेतूनच ‘उभारी’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून अशा कुटुंबांच्या पाठिशी प्रशासन आहे ही भावना रुजवायची आहे. या उपक्रमातंर्गत जळगाव जिल्ह्यात अतिशय चांगले काम सुरु आहे. या उपक्रमांतर्गत वेगवेगळया पध्दतीने मदत करता येते हे जळगाव जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी व सामाजिक संस्थांनी दाखवून दिल्याचे गौरोवोद्वगारही त्यांनी काढले.
जिल्हाधिकारी राऊत यांनीही ‘ उभारी’ साठी जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांचे कार्य व सेवाभावी संस्थांच्या योगदानाचे कौतुक केले. अमळनेरचे लाभार्थी
रत्नाबाई सुदाम पाटील, संगिता निंबा पाटील, संगिता वाल्मीक पाटील, छाया दत्तात्रय पाटील यांना शिलाई मशीन, तर रेखा संजय पाटील, उषा भागवान पाटील, सुनिता यशवंत पाटील, ललीता अर्जून पाटील यांना पिठाची छोटी गिरणी देण्यात आली. आधार संस्थेच्या अध्यक्षा भारती पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी लाभार्थींची निवड करण्यात सहकार्य केले होते.

Protected Content