जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – जिल्ह्यासह राज्यातील तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेच्या प्रलंबित सेवा विषयक मागण्यांसाठी तहसीलदार नायब तहसीलदारांतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळ्या फिती लावून जिल्हास्तरीय धरणे आंदोलन करण्यात आले.
राज्यातील नायब तहसीलदार, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी आदी अधिकाऱ्यांच्या शासन स्तरावर प्रलंबित सेवा संदर्भात वेळोवेळी निवेदने देण्यात आली आहेत. यात नायब तहसीलदार, तहसीलदार संवर्गाची सेवा जेष्ठता यादी प्रसिद्ध करणे, नायब तहसीलदार यातून तहसीलदार संवर्गात पदोन्नती, तहसीलदारांची उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती, परिविक्षाधीन नायब तहसीलदार व तहसीलदार यांचे परिविक्षाधीन कालावधी समाप्तीचे प्रस्ताव तसेच नायब तहसीलदार, तहसीलदार यांचे स्थायित्व प्रमाणपत्रे प्रस्ताव निकाली काढणे तसेच महिला अधिकाऱ्यांना महसूल विभाग वाटप करताना सोईचे ठिकाण देण्यासंदर्भात सुधारणा आदी न्याय्य प्रलंबित मागण्यांसाठी तहसीलदार, नायब तहसीलदारांचे जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात धरणे आंदोलन करण्यात आले.
‘बेमुदत काम बंद’ चा इशारा
या आंदोलनाचा पुढील टप्पा १८ एप्रिल रोजी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाईल, मागण्या मान्य न झाल्यास ४ मे रोजी बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा या निवेदनाद्वारे आंदोलन कर्त्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, किरण सावंत- पाटील, प्रांताधिकारी महेश सुधाळकर, उपजिल्हाधिकारी प्रसाद मते, रवींद्र भारदे, तहसिलदार नामदेव पाटील, महेंद्र माळी, अमोल मोरे, जितेंद्र कुवर, मिलिंद वाघ, उषाराणी देवगुणे, श्वेता संचेती, योगेश टोम्पे, दीपक ढिवरे, नायब तहसीलदार विशाल सोनवणे, अमित भोईटे, संभाजी पाटील, सुनील समधाने, प्राजक्ता केदार, रुपाली काळे आदी उपस्थित होते.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/4827074874057095