बुलढाणा, प्रतिनिधी | जिल्ह्यातील मलकापुर शहरात लगत असलेल्या सावजी जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरीच्या परिसरात बुधवारी सायंकाळच्या सुमारास मजूर काम करित असलेल्या कामगारांना परिसरात बिबट्या फिरत असल्याचे निर्दशनास आले.
सावजी जिनिंगमध्ये अचानक बिबट्या दिसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शहरातील काही भागात बिबट्या दिसल्याची चर्चा होत आहे. मलकापूर शहराला लागून असलेल्या परिसरात काही मजुरांना सायंकाळी एक बिबट्या दिसून आला. एका मजुराने या बिबट्याचा व्हिडीओ बनवून सोशल मिडीयावर व्हायरल केल्याने सध्या बिबट्या शहरात फिरत असल्याचा चर्चेलाही उधाण आले आहे. याबाबतची माहीती वन विभागाला देण्यात आल्यानंतर वनविभागाने परिसराची पाहणी केली आहे. त्या ठिकाणी बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत.