मराठा मोर्चावर विनायक मेटे ठाम

 

बीड : वृत्तसंस्था । ‘बीडमध्ये कितीही हजार पोलिसांचा बंदोबस्त असला तरी मराठा मोर्चा निघणारच’ असा निर्धार शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी केला आहे.

 

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत आज बीडमधून मराठा क्रांती संघर्ष मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. याची संपूर्ण तयारी करण्यात आली असून थोड्याच वेळात मोर्चाला सुरुवात होणार असल्याची माहिती आहे.

 

सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर बीडमध्ये राज्यातला हा पहिला मराठा क्रांती मोर्चा असणार आहे. या मोर्चाचे काय पडसाद राज्यभर उमटतात हेदेखील पाहणे आता महत्त्वाचं आहे. तर मोर्चाला सुरुवात करण्याआधी विनायक मेटे यांनी नारायणगडाचं दर्शन घेतलं. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकारला सद्बुद्धी येवो असं साकडं त्यांनी घातलं.

 

यानंतर विनायक मेटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये महत्त्वाची बैठक पार पडत आहे. मोर्चातील पुढची रुपरेषा ठरवून राज्यभर आंदोलनाची दिशा जाहीर करणार असल्याचंही सांगण्यात येत आहे. या बैठकीसाठी राज्यभरातून आलेल्या संघटनांचे प्रतिनिधीदेखील उपस्थित आहेत. इतकंच नाहीतर मोर्चा यशस्वी होणारच असा विश्वास विनायक मेटे यांनी व्यक्त केला आहे.

 

दरम्यान, कोरोनाचं भीषण संकट असल्यामुळे मोर्चाच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एसरपीएफच्या एका तुकडीसह 531 पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. यामध्ये 3 डीवायएसपी, 11 पीआय, 28 पीएसआय, 96 महिला पोलिसांसह 306 पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

 

Protected Content