मुंबई, वृत्तसंस्था। मराठा संघटनांकडून शनिवारी म्हणजेच १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदचं आवाहन करण्यात आलं होतं. मात्र सरकारने अनेक मागण्या मान्य केल्याने उद्याचा बंद मागे घेत असल्याची माहिती मराठा सकल महासंघाचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली आहे.
मराठा संघटनांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यंत्री अजित पवार यांच्यासोबत गुरुवारी झालेल्या चर्चेनंतर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर बंद मागे घेण्याबाबत घोषणा सुरेश पाटील यांनी केली आहे. या संदर्भात काल रात्री उशीरा सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, अनिल परब, विजय वडेट्टीवार उपस्थित होते. सुरेश पाटील यांनी सांगितलं की, रात्री उशीरा बैठक झाली. सरकारने अनेक मागण्या मान्य केल्याने उद्याचा बंद मागे घेत आहोत.