पुणे प्रतिनिधी । मराठा आरक्षणासाठी आज छत्रपती उदयन राजे आणि छत्रपती संभाजीराजे भोसले यांची पुण्यात बैठक झाली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना उदयन राजे यांनी आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेऊन श्वेतपत्रीका काढण्याची मागणी केली.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी संभाजीराजे छत्रपती आणि उदयनराजे भोसले यांची पुण्यात भेट झाली. यानंतर दोघांनीही प्रसारमाध्यमांशी एकत्रितपणे संवाद साधला. यावेळी उदयनराजे यांनी संभाजीराजे यांच्या कोल्हापुरातील मोर्चाला आपला पाठिंबा जाहीर केला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाची राज्यघटना लिहून आता अनेक वर्षे उलटली आहेत. तेव्हाच्या आणि आताच्या परिस्थितीत जमीन-अस्मानाचा फरक आहे. मग तसे असेल तर कायद्यात सुधारणा या झाल्याच पाहिजेत. बाकीच्यांना आरक्षण मिळालं, तसं मराठ्यांना मिळायला हवं. लोकसंख्येच्या हिशेबाने देणार असेल तर कॅल्क्युलेशन करा, असे उदयनराजे भोसले यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत मी जेव्हा जेव्हा इच्छा व्यक्त केली तेव्हा एक ते दीड दिवसांमध्ये मला भेट दिली. फक्त मराठा आरक्षणाबाबत तांत्रिक बाबींमुळे कदाचित त्यांची अडचण झाली असेल. त्यामुळे त्यांनी यावेळी भेट टाळली असावी, असे संभाजीराजे यांनी सांगितले.
23 मार्च 1994 ला जीआर काढून आरक्षण देता, ते रद्द करु नका. मग जीआर काढून मराठ्यांनाही आरक्षण द्या. आम्ही जातपात पाहिली नाही. पण आज जाणवत आहे, बोलताना मित्र अंतर ठेवत आहेत. ही दुफळी राज्यकर्त्यांनी निर्माण केली. समाजाचा याच्याशी काही संबंध नाही. राज्यकर्त्यांची इच्छा असेल, तर समाजाशाठी एकत्र यावं. संभाजीराजे किंवा मी दुफळी निर्माण केली नाही. द्यायचं असतं तर मागेच दिलं असतं, यांची इच्छाशक्तीच नाही. त्यामुळे मराठा आरक्षण मिळत नाही. राजकारणी व्यक्तीकेंद्रीत झालेत. उद्या जर तरुणांचा उद्रेक झाला तर त्याला जबाबदार ते असतील. त्यावेळी ना उदयनराजे, ना संभाजीराजे हा उद्रेक थांबवू शकणार नाहीत. आम्ही दोघे आडवे पडलो तरी आमच्यावर घणाघात होईल, आम्हाला बाजूला केलं जाईल..अशी वेळ येऊ देऊ नका, पण ती येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.