मुंबई प्रतिनिधी । मराठा आरक्षणाबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकांवरील सुनावणी आता २८ जानेवारीपासून होणार आहे.
याबाबत वृत्तांत असा की, राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षणाची घोषणा केल्यानंतर या निर्णयाच्या विरूध्द याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. यावरील सुनावणीसाठी राज्य सरकारने आरक्षणाबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी अलीकडेच न्यायालयाने १८ जानेवारीपर्यंत मुदत दिली होती. तसेच मराठा आरक्षणाबाबत दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिकांवर २३ जानेवारी पासून न्यायमूर्ती रणजित मोरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार असल्याचेही निर्देश देण्यात आले होते.
या अनुषंगाने आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. यात न्यायालयाने राज्य सरकारला मागासवर्ग आयोगाचा संपूर्ण अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. या अहवालातील २० वादग्रस्त पाने वाचून याला याचिकादारांना द्यावयाचे की नाही हे न्यायालय ठरविणार आहे. परिणामी, हा अहवाल सादर केल्यानंतर याची पुढील सुनावणी होणार आहे. यानुसार आता मराठा आरक्षणावरील सुनावणी २८ जानेवारीपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.
दरम्यान, मेगा भरतीमधील मराठा आरक्षण संबंधित अंतरिम स्थगिती हटविण्याची सरकारने उच्च न्यायालयाकडे मागणी केली आहे.