कोलकाता : वृत्तसंस्था । पश्चिम बंगालचे भाजप नेते अनुपम हाजरा करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. अनुपम हाजरा भाजप राष्ट्रीय सचिव आहेत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने हाजरा चर्चेत होते. कोरोना झाला तर ममतांची गळाभेट घेईन, असं वक्तव्य त्यांच्या अंगलट आलं होतं.
शुक्रवारी अनुपम हाजरा करोना संक्रमित असल्याचं आढळलंय. ‘ममता सरकारनं मृतांना चुकीची वागणूक दिली. अशी वागणूक तर कुत्रे-मांजरांनाही दिली जात नाही’ असं म्हणतानाचा हाजरा यांनी ममता बॅनर्जी यांना ‘कोरोनापेक्षा मोठा शत्रू’ करार दिलं होतं. मी करोना संक्रमित आढळलो तर पहिल्यांदा जाऊन ममता बॅनर्जी यांची गळाभेट घेईन’ असं वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर टीका झाली होती. सिलिगुडीमध्ये हाजरा यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता.
अनुपम हाजरा हे भाजपमध्ये सहभागी होण्याअगोदर तृणमूल पक्षाचे नेते होते. गेल्याच वर्षी ते भाजपमध्ये दाखल झाले. त्यानंतर नुकतंच भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी जाहीर केलेल्या यादीत हाजरा यांना राष्ट्रीय सचिवपदी नियुक्त करण्यात आल्याचं म्हटलं होतं.