मनाच्या भावनेतून व्यक्त होतील त्याच कविता या खऱ्या कविता असतात– नामदेव कोळी

 

 

जळगाव, प्रतिनिधी । मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने आज शनिवार दिनांक २७ फेब्रुवारी रोजी विवेकानंद प्रतिष्ठान पुरस्कृत वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात मराठी भाषा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम ऑनलाईन स्वरूपात घेण्यात आला. 

कार्यक्रमाचे उदघाटन चोपडा येथील पंकज कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. किशोर पाठक,  यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून खान्देशच्या मातीतले प्रसिद्ध कवी व अनुवादक, भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात संत श्री.ज्ञानेश्वर महाराज यांना मानवंदना देणारी चित्रफित दाखवून करण्यात आली तर  कार्यक्रमाची रूपरेषा आजच्या दिनाचे महत्व आणि कुसुमाग्रज यांच्या कार्याची माहिती महाविद्यालयाचे ग्रंथपाल हितेश ब्रिजवासी यांनी आपल्या प्रास्ताविकातून करून दिली. उदघाटक डॉ. किशोर पाठक यांनी मराठीचा वापर दैनंदीन जीवनात अधिकाधिक करावा असे मत व्यक्त करून उपस्थितांना आव्हान केले. या नंतर कार्यक्रमाचे मुख्य वक्ते कवी. नामदेव कोळी यांनी “काळोखाच्या कविता” या स्वरचित काव्यसंग्रहातील निवडक कवितांचे वाचन करून दाखविल्या आणि त्यांचा भावार्थ उपस्थितांना समजवला. कवी का, कसा आणि कोणत्या परिस्थितीत कविता लिहितो आणि त्यातून समाजाला कोणता संदेश देऊ इच्छितो याबद्दल देखील त्यांनी भाष्य केले. तसेच ज्या कविता मनाच्या भावनेतून लिहिल्या जातात त्याच कविता ह्या खऱ्या कविता असतात असे मत व्यक्त केले यानंतर कार्यक्रमाची सांगता ‘सर्वात्मका शिवसुंदरा” या कवितेची चित्रफित दाखवून करण्यात आली. सूत्रसंचालन आशा पाटील यांनी तर परिचय हितेंद्र सरोदे व आभार डॉ. वैजयंती चौधरी यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन हितेश ब्रिजवासी यांनी केले तर मार्गदर्शन उमेश इंगळे यांचे लाभले.

 

 

Protected Content