मुंबई प्रतिनिधी । राज्यातील आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेवा पूर्ण ताकदीनिशी उतरणार असल्याचे संकेत मिळाले असून राज ठाकरे यांनी याबाबतचे निर्देश सर्व जिल्हाध्यक्षांना दिले आहेत.
काही दिवसांपूर्वीच राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या अनुषंगाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्षांना आपल्या भागातील ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेचा उमेदवार उभा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या निवडणुका पूर्ण ताकदीनं लढवण्याच्या सूचनाही राज यांनी दिल्याचं सूत्रांनी सांगितलं.
आम्ही ग्रामपंचायतीच्या निवडणुका संपूर्ण ताकदीनिशी लढवणार आहोत. त्यासाठी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिले आहेत. किती जागा लढवायच्या हे अजून ठरलेलं नाही. मात्र, स्थानिक नेतृत्व परिस्थिती पाहून निर्णय घेतील, असं मनसेचे नेते आणि माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी सांगितलं.
राज्यातील ३४ जिल्ह्यांतील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान; तर १८ जानेवारी २०२१ रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे.