नागपूर : वृत्तसंस्था । मनसेसोबत मुंबई महापालिकेत युती होणार का? असा सवाल करण्यात आल्यावर योग्यवेळी योग्य निर्णय होईल, असं सूचक विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
महाराष्ट्रामधील आगामी काळामध्ये येणारी सर्वात मोठी निवडणूक म्हणजे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक असून या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी युती करणार हा प्रश्न वारंवार समोर येत असतो.
मनसेने परप्रांतीयांबाबतचा मुद्दा सोडला तर त्यांच्याशी युती होऊ शकते, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. याबाबत देवेंद्र फडणवीसांना विचारले असता, मनसेसोबत युती करण्याचा निर्णय योग्यवेळी होईल. अजून त्याला वेळ आहे, असं ते म्हणाले. चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य तुम्ही पूर्णपणे समजून घेत नाही. अर्धवट समजून घेता, असंही त्यांनी म्हटलं.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही सध्या नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. दोन्ही नेत्यांचा मुक्काम शासकीय विश्रामगृहातच आहे. त्यामुळे हे दोन्ही नेते भेटण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. हे दोन्ही नेते एकमेकांना भेटल्यास त्यांच्यात युतीबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे. तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांच्यासोबत चंद्रकांत पाटील हे नाशिक, पुणे, ठाणे आणि मुंबई महापालिकेच्या युतीबाबत चर्चा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांची पहिल्यांदाच ही भेट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भेटीतून राज्याच्या राजकारणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.
याआधी दोन्ही पक्षांची क्षेत्रीय अस्मितेसंदर्भातील मतं जुळली नाही तर मनसेसोबत युती करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असं फडणवीसांनी म्हटलं होतं. सध्या तरी भाजपा आणि मनसे या दोन पक्षांचे विचार जुळत नसल्याचं फडणवीस यांनी यावेळी म्हटलं होतं.