नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्रीय गृहमंत्रालयाने लॉकडाऊनची मुदत दोन आठवडे वाढवितानाच ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये दारू विक्रीला परवानगी दिल्याचे वृत्त होते. त्यामुळे रेड झोनमधील मद्यप्रेमींमध्ये काहीशी निराशा होती. परंतू सरकारने आता तिन्ही झोनमध्ये दारू विक्रीला परवानगी दिली आहे. दरम्यान, कंटेनमेंट झोनमध्ये मात्र, मद्यविक्रीस बंदी कायम राहणार आहे.
गृह मंत्रालयाने शुक्रवारी टाळेबंदीची मुदत १७ मेपर्यंत दोन आठवडय़ांसाठी वाढवण्याची घोषणा करतानाच, ग्रीन व ऑरेंज झोनमधील अनेक निर्बंध उठवले होते. ४ मेपासून सुरू होणाऱ्या लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात ग्रीन व ऑरेंज क्षेत्रांमध्ये सलून उघडण्यास परवानगी दिली आहे. तसेच तिन्ही क्षेत्रांत मद्यविक्रीस मुभा देण्यात आल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने शनिवारी स्पष्ट केले आहे. परंतू यासाठी काही अटी घालून देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार ग्रीन, ऑरेंज व रेड या तिन्ही झोनमध्ये, बाजारपेठा व मॉलमध्ये नसलेल्या, स्वतंत्र अशा दारूच्या दुकानांना परवानगी राहणार आहे. यात ग्राहकांना एकमेकांपासून ६ फुटांचे अंतर राखावे लागणार आहे. तसेच एकावेळी पाचपेक्षा अधिक ग्राहक दुकानात असणार नाहीत हेही सुनिश्चित करावे लागणार आहे.