मुंबई: वृत्तसंस्था । वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या ‘अकोला पॅटर्न’चे महत्त्वाचे शिलेदार, माजी मंत्री मखराम पवार यांचं निधन झालं. मुंबईतील लिलावती रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 84 वर्षाचे होते.
मखराम पवार काही दिवसांपासून आजारी होते. त्यामुळे त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, मध्यरात्री 1 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील लोहगड या त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
भारिप बहुजन महासंघाचे पहिले आमदार, माजी मंत्री मखराम पवार यांनी नंतरच्या कालावधीत बहुजनांची सत्ता यावी यासाठी जातीविरोधात भूमिका घेतली पाहिजे हे नुसते बोलून दाखवले नाही. तर कृतीतही उतरवले. त्यांनी किनवटच्या निवडणुकीत आदिवासींच्या बाजूने उभे राहून आपल्याच समाजाच्या विरोधात प्रचार करून आदिवासी उमेदवार निवडून आणला. आंबेडकरी चळवळीसाठी ही नव्याने सुरूवात होती, अशा शब्दात वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली.
मखराम पवार यांच्या निधनामुळे ओबीसी, भटके-विमुक्त, वंचित समाजाचे कधीही न भरून निघणारे नुकसान झालेले आहे, अशा शब्दात माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी पवार यांना श्रद्धांजली वाहिली.
प्रकाश आंबेडकर यांनी 1990मध्ये अकोला पॅटर्न तयार केला होता. वंचित जाती, बाराबलुतेदार आणि प्रवाहाच्या बाहेर असलेल्या घटकांना राजकारणाच्या मुख्यप्रवाहात आणण्याचा प्रयोग प्रकाश आंबेडकरांनी केला होता. तोच अकोला पॅटर्न म्हणून गाजला. या अकोला पॅटर्नच्या माध्यमातून त्यांनी मखराम पवार यांना किनवटमधून निवडणुकीच्या मैदानात उतरवले आणि हा प्रयोग यशस्वी झाला. मखराम पवार विजयी झाल्याने अकोला पॅटर्नची प्रचंड चर्चा झाली. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात मखराम पवार कॅबिनेट मंत्री होते.