जळगाव प्रतिनिधी । महसूल विभागातील कर्मचार्याची बदली करून देण्यासाठी लाच घेणार्या मंत्रालयातील लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली.
ओमप्रकाश लखनलाल यादव (वय ३२, रा.रूम नं. १०३, बी विंग, गोपाल हाइट्स, बदलापूर, जि.ठाणे) हा मंत्रालयातील महसूल विभागात लिपिक पदावर नोकरीस आहे. यादव याने अमरावती येथे महसूल विभागात नोकरीस असलेल्या कर्मचार्याची जळगावात बदली केल्याचा दावा केला होता. संबंधित कर्मचार्याची जळगावात बदली होऊन तो हजरही झाला. यानंतर या बदलीपोटी एक लाख रुपये लाचेची मागणी यादव याने काही दिवसांपूर्वी केली होती. लाचेची रक्कम गुरुवारी जळगावात घेण्याचे ठरले होते. त्यानुसार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती. यानुसार सापळा रचण्यात येऊन त्याला एक लाख रूपये स्वीकारतांना अटक करण्यात आली. ही कारवाई जळगाव शहरातील कालिंकामाता मंदिर परिसरातील एका हॉटेलमध्ये करण्यात आली.