पाचोरा, नंदू शेलकर । पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्या मनमानी कारभारा विरोधात सेनेचे उपजिल्हाप्रमुख अॅड. अभय पाटील यांनी अनेक वेळा तक्रारी देवून देखील याची दखल न घेतल्याने त्यांनी आजपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आरंभले आहे.
पाचोरा तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये विविध योजनांच्या कामांमध्ये झालेला गैर व्यवहार तसेच अनेक ग्रामपंचायतींच्या दप्तरात अनियमितता व अफरा तफर असे प्रकार आढळुन आली आहे. त्याबाबत अनेक गावांच्या ग्रामपंचायती विरुद्धचे पुराव्यासह तक्रार अर्ज प्रलंबित आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये दारिद्रय रेषेखालील यादीत झालेला घोळ, स्वच्छ भारत मिशन व वैयक्तिक शौचालयाचे लाभार्थींच्या योजनेत गैरव्यवहार पुराव्यानिशी दिसुन आला असतांना देखील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी कुठल्याही प्रकरणांची चौकशी न करता सदर झालेल्या गैरव्यवहारातील संबंधितांना ते पाठिशी घालत असल्याचे यावरून दिसुन येत आहे. गट विकास अधिकारी हे जबाबदार अधिकारी असतांना देखील त्यांनी कुठलीच कारवाई न करता या सर्व प्रकाराकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत असल्यामुळेच व अनेकदा त्यांना याबाबत पुराव्यानिशी तक्रारी देऊनही त्याचा काही एक उपयोग झालेला नसल्याने न्याय मिळण्यासाठी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अॅड. अभय शरद पाटील हे तहसिल कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसले आहे. यावेळी सेनेचे शहराध्यक्ष किशोर बारावकर, शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख अरुण पाटील, काॅंग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, अक्षयकुमार जैस्वाल, पं. स. सदस्य ललित वाघ, नगरसेवक विकास पाटील, रणजीत पाटील यांनी भेटी देऊन आपला पाठिंबा दर्शविला आहे.
पाचोरा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी हे तालुक्याचे अधिकारी असतांना त्यांना पंचायत समिती स्तरावरील कुठल्याही विभागावर कारवाई करण्याचे अधिकार असतांना त्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर करुन भ्रष्टाचार करणाऱ्यांना कुठलीच कारवाई न करता रान मोकळे करुन दिले आहे. तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्र्वर), नगरदेवळा, कोल्हे, डांभुर्णी, वरसाडे, भोकरी, कुऱ्हाड, लोहारा यासह अनेक गावांतील १४ व्या वित्त आयोगाच्या कामांबाबत लेखी तक्रारी पंचायत समितीकडे प्राप्त झालेले असतांनाही सदर विस्तार अधिकारी व गट विकास अधिकारी यांनी कोणतीही कारवाई या बाबत केलेली नाही, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतील घरकुल, विहीरी, शाळेला संरक्षण भिंत अशी कामे केलेली आहेत याबाबत पुराव्यानिशी तक्रारी अर्ज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना देवुनही कुठलीच कारवाई झाली नाही. यासह तालुक्यातील राज्य शासनांच्या विविध योजनांमध्ये झालेला भ्रष्टाचाराची योग्य ती चौकशी करुन यात सहभागी असलेल्या पंचायत समितीतील विस्तार अधिकारी, ग्राम विकास अधिकारी व ग्रामसेवक तसेच या सर्वांना पाठीशी घालणारे पंचायत समितीतील भा.ज.पा.चे सभापती व सदस्य तसेच काही भा.ज.पा.चे जिल्हा परिषद सदस्य यांच्याशी संगनमत असलेले गटविकास अधिकारी या सर्वांना चौकशी करून निलंबित करावे व यांच्यावर गुन्हे दाखल करावेत यांचेवर निलंबनाची कारवाई करावी. या रास्त मागणीसाठी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अॅड अभय शरद पाटील हे दि. १७ आॅगस्ट रोजी तहसिल कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसले आहे. यावेळी पंचायत समिती गट विकास अधिकारी अतुल पाटील, विस्तार अधिकारी राजकुमार धस यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांसह भेट दिली. येत्या १५ दिवसांत चोकशी करण्याचे आश्वासन दिले. परंतु चौकशी केल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका उपोषणकर्ते अॅड. अभय पाटील यांनी घेतल्याने सदरचे प्रकरण चिघळले आहे.
https://www.facebook.com/508992935887325/videos/2960917447508569