नवी दिल्लीः वृत्तसंस्था । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचाराविरूद्ध झिरो टॉल रन्स संदर्भात ‘व्हिजिलन्स आणि अँटी करप्शन’ च्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केलं.
पहिले गृहमंत्री म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांनी अशी व्यवस्थान बनवण्याचा प्रयत्न केला ज्यात धोरणांमध्ये नैतिकता असेल. नंतरच्या दशकात वेगळीच परिस्थिती निर्माण झाली, असं पंतप्रधानांनी सांगितलं.
हजारो कोटींचे घोटाळे, बनावट कंपन्यांचे जाळे, कर चुकवेगिरी हे सर्व गैरप्रकार वर्षानुवर्षे चर्चेच्या केंद्रस्थानी होते. २०१४ मध्ये देशाने मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला तेव्हा सर्वात मोठे आव्हान हे वातावरण बदलण्याचे होते. गेल्या काही वर्षांत भ्रष्टाचाराबाबत झिरो टॉलरन्सने देश पुढे गेला आहे. २०१४ पासून आतापर्यंत प्रशासकीय, बँकिंग व्यवस्था, आरोग्य, शिक्षण, शेती, कामगार या सर्व क्षेत्रात सुधारणा करण्यात आल्या आहेत, असं मोदी म्हणाले.
भ्रष्टाचार म्हणजे फक्त काही रुपयांचा विषय नाही. भ्रष्टाचाराने देशाच्या विकासाला ठेच पोहोचते. त्याचवेळी भ्रष्टाचाराने सामाजिक समतोलही नष्ट होतो. देशाच्या व्यवस्थेवर जो विश्वास हवा आहे तो भ्रष्टाचारामुळे उडतो, असं मोदींनी सांगितलं.
भ्रष्टाचाराची घराणेशाही हे आजवरचे सर्वात मोठे आव्हान आहे. भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये कठोर शिक्षा होत नाही किंवा किरकोळ शिक्षेमुळे इतरांच्या मनातील भीतीही दूर होते.. ही परिस्थितीही अत्यंत धोकादायक आहे. म्हणूनच भ्रष्टाचाराच्या घराणेशाहीवर हल्ला करावा लागेल, असं आवाहन मोदींनी केलं.
डीबीच्या माध्यमातून थेट १०० टक्के लाभ गरीबांपर्यंत पोहोचला आहे. फक्त डीबीटीमुळे १ लाख ७० हजार कोटींपेक्षा जास्त रुपये चुकीच्या हातात जाण्यापासून वाचले आहेत. देशाने घोटाळ्यांचे ते युग मागे सारले आहे, हे मी आज अभिमानाने सांगतो, असं मोदी म्हणाले.