भुसावळ तालुक्यात पॅनलविनाच अनेक गावांमध्ये झाली निवडणूक

 

भुसावळ, प्रतिनिधी । तालुक्यातील 24 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक झाल्यानंतर सोमवारी जळगाव रोडवरील तहसील कार्यालयाच्या आवारातील गोदामात मतमोजणीत कुठे सत्ता परीवर्तन तर कुठे नवख्या उमेदवारांना संधी मिळाल्याचे दिसून आले.

प्रत्यक्ष मतमोजणीस सकाळी १० वाजता प्रारंभ होऊन दुपारी एक वाजेपर्यंत सर्व ग्रामपंचायतींची मतमोजणी आटोपली. निवडणूक निकाल ऐकण्यासाठी कार्यकर्त्यांची तोबा गर्दी असलीतरी प्रशासनाकडून निकाल सांगण्यासाठी लाऊड स्पीकर लावण्यात न आल्याने समर्थकांच्या आनंदावर विरजण पडले मात्र उमेदवार वा त्यांचा समर्थक बाहेर पडून इशारा करताच समर्थकांकडून जल्लोष करण्यात येत होता तर फटाक्यांची आतषबाजी करून उमेदवाराला उचलून आनंदही व्यक्त करण्यात आला. अनेक ग्रामपंचायतींमध्ये प्रस्थापीतांना मतदारांनी नाकारत तरुण रक्ताला संधी दिल्याचे दिसून आले तर अनेक ठिकाणी मातब्बरांचा पराभव झाला. असे असलेतरी सरपंच पद आरक्षण जाहीर झाल्यानंतरच ग्रामपंचायतमधील राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे.

एक मार्ग वाहतूकीसाठी केला बंद

मतमोजणीच्या पार्श्वभुमीवर तहसील कार्यालयासमोरील पेट्रोल पंपापासून बॅरकेट लावण्यात आले तर तहसीलला लागून असलेला मार्गावरून वाहतूक सुरू होती. समोरच्या रस्त्यावरील वाहतूक मात्र निकाल ऐकण्यासाठी आलेल्या नागरीकांच्या उपस्थितीमुळे बंद करण्यात आला होता. डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनखाली शहरचे पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, बाजारपेठ निरीक्षक दिलीप भागवत, तालुक्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या नेतृत्वात छावणी उभारून कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता.

तीन तासात निकाल हाती

26 पैकी कठोरा बु.॥ व शिंदी येथील निवडणूक बिनविरोध झाल्याने 24 ग्रामपंचायतींसाठी सोमवारी सकाळी 10 वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला तर दुपारी एक वाजेपर्यंत सर्व ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले.

ईश्वर चिठ्ठीत माजी सभापतींचा पराभव

भुसावळ तालुक्यातील साकरी व बोहर्डी बु.॥ येथे प्रभाग एकमध्ये झालेल्या निवडणुकीसाठी चौघा उमेदवारांना समान मते पडल्याने ईश्‍वरचिठ्ठीचा निर्णय घेण्यात आला. ईश्‍वरचिठ्ठीत साकरी येथील रोशन अंबादास पाटील (247) यांचा विजय झाला तर प्रतिस्पर्धी तथा कृउबाचे माजी सभापती सोपान भारंबे (247) यांचा पराभव झाला. बोहर्डी बुद्रुक यथील संगीता संतोष गोपाळ (193) या ईश्‍वरचिठ्ठीत विजयी झाल्या तर प्रतिस्पर्धी लताबाई विजय तोटे (193) यांचा पराभव झाला.

ध्वनीक्षेपक नसल्याने नाराजी

भुसावळ तालुक्यातील गावगाडा चालवण्यासाठी प्रभारी ठरवणार्‍या पदांसाठी अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत नेमका कुणाचा जय वा पराजय होते हे ऐकण्यासाठी भुसावळात भल्या सकाळीच दाखल झालेल्या ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींसह कार्यकर्त्यांनी भुसावळ तहसील कार्यालयाबाहेर गर्दी केली होती. क्षणा-क्षणाला प्रशासनाकडून अपडेट मिळतील, अशी आस कार्यकर्त्यांना असलीतरी गाफील प्रशासनाने साधा ध्वनीक्षेपकही न लावल्याने अत्यंत नाराजीचा सूर उपस्थितांमधून उमटला.

बहुतांश ठिकाणी राजकीय पॅनलविनाच निवडणूक

भुसावळ तालुक्यात 24 ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीत बहुतांश गावांमध्ये कुठल्याही पॅनलविनाच निवडणूक लढवण्यात आली तर साकेगावसह खडका, कंडारी, टहाकळी आदी प्रमुख गावांमध्ये मात्र पॅनलद्वारे निवडणूक लढवण्यात आली.

विजयाचा आनंद अन् फटाक्यांची आतषबाजी

सोमवारी सकाळी 10 वाजता प्रत्यक्षात मतमोजणीला सुरूवात झाली असलीतरी तासभर आधीच कार्यकर्त्यांनी तहसीलबाहेर डेरा जमवला होता. तर उमेदवार वा त्यांचे प्रतिनिधी निकाल ऐकून बाहेर येताच विजयाचा इशारा केल्यानंतर कार्यकर्त्यांकडून टाळ्या व शिट्या वाजवून तसेच उमेदवाराला उचलून जल्लोष करण्यात येत होता शिवाय फटाक्यांची आतषबाजी करूनही जल्लोष करण्यात आला.

पत्रकार कक्ष ठरला नावालाच

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी माध्यमांसाठी स्वतंत्र पत्रकार कक्ष कार्यान्वीत करण्यात आला असला तरी त्याचा प्रत्यक्षात उपयोग मात्र शून्य असल्याचे दिसून आले. उमेदवार वा त्यांच्या समर्थकांकडून माध्यमांना माहिती मिळत असलीतरी स्थानिक तहसील प्रशासनाच्या भोंगळ नियोजनामुळे माध्यमांना अधिकृत माहिती अखेरच्या क्षणापर्यंत मिळालीच नाही. शिवाय माध्यमांना मतमोजणी ठिकाणी प्रवेश देण्यास नकार देण्यात आल्याने माध्यमांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

पिंप्रीसेकममध्ये गुरूजीतसिंग चाहेल दोन प्रभागातून विजयी

पिंप्रीसेकम ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत दोन प्रभागातून उमेदवार गुरूजीतसिंग चाहेल हे प्रचंड मताधिक्याने निवडून आले. प्रभाग एकमध्ये त्यांना 500 मते मिळाली तर प्रभाग चारमध्ये 740 मतांनी ते निवडून आले.

Protected Content