भुसावळात होणारी ‘लेडीज इक्वालिटी रन’ स्पर्धा स्थगित

 

 भुसावळ प्रतिनिधी । जागतिक महिला दिनानिमित्त भुसावळ स्पोर्टस अॅन्ड रनर्स असोसिएशन आयोजित ‘लेडीज इक्वालिटी रन २०२१’ चे आयोजन कोरोना आजाराच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे काही दिवसांसाठी स्थगित करण्यात आली  असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

जागतिक महिला दिवसाच्या पार्श्वभूमीवर ७ मार्च रोजी  ‘लेडीज इक्वालिटी रन २०२१’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्या संदर्भातील तयारीदेखील अंतिम टप्प्यात होती. परंतु अचानक भुसावळ शहरात २० फेब्रुवारीपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सुरुवातीस दर मंगळवार, गुरुवार व रविवारी होणारे प्रशिक्षण कार्यक्रम बंद करण्यात आले. वाढती रुग्ण संख्या कायम असल्याने प्रशासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत ही स्पर्धा काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे.

आज बुधवार रोजी या संदर्भात भुसावळ स्पोर्ट्स अँन्ड रनर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यात या विषयावर सविस्तर चर्चा झाली. कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर व परिस्थिती सामान्य झाल्यानंतर प्रशासनाची परवानगी घेऊन ही स्पर्धा मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात येईल अशी माहिती संयोजिकाद्वय डॉ.  नीलिमा नेहेते व डॉ. चारुलता पाटील यांनी दिली. 

सहभागी महिला स्पर्धकांनी दरम्यानच्या काळात धावण्याचा एकाकी सराव सुरू ठेवावा व नियमित वॉर्मअप व स्ट्रेचिंग व्यायाम प्रकार घरी करावा असे आवाहन प्रवीण फालक  यांनी केले आहे.   स्पर्धेची  नवीन तारीख निदान १५ दिवस आधी कळवण्यात येईल व स्पर्धेच्या आदल्या दिवशी प्रत्येक सहभागी महिला स्पर्धकास टी-शर्ट चे वितरण करण्यात येईल. शिवाय रन यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या स्पर्धकास पदक देखील प्रदान करण्यात येईल. दरम्यान नाव नोंदणी ऑनलाइन व प्रत्यक्ष फॉर्म भरुन देखील सुरू राहील त्यासाठी संयोजिका डॉ. नीलिमा नेहेते व डॉ. चारुलता पाटील यांच्याशी संपर्क करावा अशी माहिती देण्यात आली.

 यावेळी प्रवीण फालक,  डॉ. नीलिमा नेहते,  डॉ. चारुलता पाटील, डॉ. तुषार पाटील, गणसिंग पाटील, पुनम भंगाळे, प्रवीण वारके, रणजित खरारे, सचिन अग्रवाल, ब्रिजेश लाहोटी, प्रवीण पाटील उपस्थित होते. 

 

Protected Content