भुसावळ प्रतिनिधी । भुसावळातून खंडव्याकडे निघालेल्या मालगाडीचे तब्बल सात डबे रेल्वे यार्डातील मेन लाईनवरील आरओएच डेपोजवळ घसरल्याची घटना रविवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातामुळे अप-डाऊन लाईनीवरील वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. सकाळी ९.३५ वाजेच्या सुमारास अप लाईनीवरील वाहतूक सुरळीत करण्यात यंत्रणेला यश आले.
मालगाडीची चाके रेल्वे रूळाखाली घसरल्याने अप-डाऊन रेल्वे मार्गावरील सुमारे दहाहून अधिक गाड्या प्रभावीत झाल्या. अनेक गाड्या रेल्वे स्थानकावर थांबू होत्या तर प्रवाशांची यामुळे चांगलीच गैरसोय झाली. 22139 पुणे-अजनी हमसफर गाडी पुढे गेल्यानंतर पुन्हा मागे घेण्यात आली तर 11057 मुंबई-अमृतसर पठाणकोट, 12811 मुंबई-हटीया, भुसावळ-बडनेरा मेमू, 12656 नवजीवन एक्स्प्रेस आदी गाड्या रेल्वे स्थानकावर थांबवून ठेवण्यात आल्या तर अन्य गाड्यांना ठिकठिकाणी थांबवून ठेवण्यात आल्याचे रेल्वेच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले.