भुसावळात कोरोना बाधितांची संख्या ३० वर; उपाययोजना ठरल्या तकलादू

जळगाव प्रतिनिधी । आज रात्रीच्या रिपोर्टमध्ये भुसावळातील चार रूग्ण हे कोरोना पॉझिटीव्ह आले असल्याची माहिती प्रशासनाने जाहीर केली आहे. दरम्यान, प्रशासन प्रयत्नांची पराकाष्ठा करत असले तरी कोरोनाचे रूग्ण वाढतच असल्याचे दिसून येत आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाने आज रात्री एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांबाबतची ताजी माहिती दिली आहे. यानुसार भुसावळमध्ये चार नवीन रूग्ण आढळून आल्याने शहरातील रूग्णांची संख्या आता ३० इतकी झालेली आहे. यातील सहा रूग्ण बरे झाले असून सात जण बरे होऊन घरी परतले आहेत.

आज पॉझिटीव्ह आढळून आलेल्या रूग्णांपैकी एकाचा आधीच मृत्यू झालेला आहे. संबंधीत रूग्ण हा गंगाराम प्लॉटमधील रहिवासी असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. तर उर्वरित तीन रूग्णांमध्ये ग्रीन पार्क व खडका रोडवरील दोन रूग्णांचा समावेश असून एकाची माहिती अद्याप समोर आलेली नाही. शहरातील खडका रोड परिसरात कोरोनाचा संसर्ग हा मोठ्या प्रमाणात होत असल्याचे आता अधोरेखीत झालेले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून प्रशासनाने शहरात अनेक उपाययोजना केल्या. आता सध्या कडकडीत लॉकडाऊन पाळण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. तथापि, इतके करूनही संसर्ग कमी होत नसल्याने प्रशासकीय उपाययोजनांवर प्रश्‍नचिन्ह लागले आहे.

Protected Content