भुसावळ प्रतिनिधी । भुसावळात क्रीडा भारती द्वारे प्रथम उपक्रम म्हणून रथसप्तमी रोजी सार्वजनिक सूर्यनमस्कार आयोजित केले गेले. कार्यक्रमास अध्यक्ष आमदार संजय सावकारे व प्रमुख पाहुणे जीवन ज्योती फाऊंडेशनचे गोपाल सोनवणे यांनी स्वतः नागरिकांसोबत सूर्यनमस्कार घातले. भुसावळातील सर्व थरातील लोकांनी सहभाग नोंदवला.
सहआयोजक म्हणून प्रतिष्ठा महिला मंडळ, भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशन, इंडियन मेडिकल असोसिएशन, राधाकृष्ण प्रभात फेरी, भारत विकास परिषद, जय मातृभूमी क्रीडा मंडळ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारत स्वाभिमान मंच या संघटनांसह शहरातील तब्बल 42 संघटनांच्या सदस्यांनी सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमात सूर्यनमस्कार घालण्याचे प्रात्यक्षिक सौ किरण जावळे व श्री चैतन्य क्षीरसागर यांनी केले. सूत्रसंचालन व शास्त्रोक्त मार्गदर्शन श्री राजू कुलकर्णी यांनी केले तर ब्रिजेश लाहोटी यांनी सर्वांचे आभार मानले.
मा. आमदारांनी आपल्या मनोगतात लहानपणी याच मैदानावर खेळताना असलेल्या गर्दीची आठवण काढली व आत्ता खाली असणारे मैदान पाहून खंत व्यक्त केली. क्रीडाभारती द्वारे असेच समाज उपयोगी उपक्रम राबवले जाऊन लोकांना पुन्हा भारतीय खेळाकडे वळवावे असे आवाहन केले. नियमित सूर्यनमस्कार व योगासन केल्यामुळे स्पॉंडलायसिस पूर्ण पणे बरे झाल्याचे बोलून दाखवले.
यासह योगेश मांडे, राजू कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनात भुसावळ शहर क्रीडा भारती कार्यकारिणीची स्थापना झाली. कार्यकारिणी अध्यक्ष ब्रिजेश लाहोटी, मंत्री पवन फालक, सहमंत्री विवेक महाजनी, वरुण इंगळे, महिला प्रमुख ज्योती सोनवणे, डॉ समीर चौधरी, दीपेश सोनार, उमाकांत बाऊसकर, योगप्रमुख वैभव पुराणिक व बापू हसबन या क्रीडा भारतीच्या सदस्यांनी रजनी सावकारे, डॉ. विरेंद्र झांबरे, भूषण वाणी, भवरलाल प्रजापत, चेतन पाटील यांनी परिश्रम घेतले.