भुसावळ प्रतिनिधी । शहरातील कोळीवाडा भागात झालेल्या निर्घृण खूनातील आरोपी धीरज शिंदे याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत वृत्त असे की, शहरात जुना सातारा भागातील कोळी वाड्यात धीरज शिंदे याने दिनांक २ मार्च रोजी सायंकाळी ५.४५ वाजेच्या सुमारास त्याच्या घरासमोर नसीर बशीर पटेल (राहणार साकेगाव) याच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून त्याचा खून केला होता. यानंतर तो लागलीच फरार झाला होता. यानंतर तो बंटी पथरोड यांच्या घरी गेला. त्यांची पत्नी सोनू पथरोड यांनी बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत यांना मोबाईलव्दारे याची माहिती दिली. यानुसार धीरज शिंदे ला दिनांक ३ मार्च रोजी रात्री साडेनऊच्या दरम्यान अटक करण्यात आली आहे. पुढील कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड व बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात येत आहे.