भुसावळातील कंटेनमेंट झोनमधील बॅरिकेडस तोडणार्‍यांवर गुन्हे दाखल

भुसावळ प्रतिनिधी । कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खडका रोडवरील कंटेंनमेंट झोनमध्ये लावलेले बॅरिकेडस तोडणार्‍या जमावाच्या विरूध्द बाजारपेठ पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून या पुढेही कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, भुसावळ शहरात कोरोना बाधीत रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असली तरी दुर्दैवाने बहुतांश जनतेला याचे गांभिर्य नसल्याचे दिसून येत आहे. महसूल, पोलीस, पालिका व आरोग्य प्रशासन प्रयत्नांची पराकाष्ठा करून संसर्ग थांबविण्याचा प्रयत्न करत असले तरी जनतेच्या बेजबाबदारपणाने यावर अक्षरश: पाणी फेरले जात असल्याचे आजचे चित्र आहे. यातच आज खडका रोडवरील कंटेनमेंट झोनमध्ये घडलेला प्रकार हा अतिशय संतापजनक असल्याचे दिसून आले.

शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास खडका रोडवरील लाल बिल्डींगजवळ असणार्‍या कंटेनमेंट झोनमध्ये बॅरिकेडस लावण्याचे काम सुरू असतांना परिसरातील उस्मानिया कॉलनी, पटेल कॉलनी, अन्सारउल्ला नगर आदी भागातील लोकांचा घोळका येऊन त्यांनी पोलिसांसोबत हुज्जत घातली. या भागात अडथळे उभे केल्यामुळे आम्हाला अडचणी होत असल्याने येथे बॅरिकेड लाऊ नये अशी त्यांची मागणी होती. यानंतर या जमावाने पोलीस प्रशासनाने लावलेले बॅरीकेडस उखडून टाकले. यामुळे बाजारपेठ पोलीस स्थानकात आसीफ खान हबीब खान, एहसान डॉक्टर, नदीम बागवान, मुस्तकीन बागवान, बाबा टिचर, लक्ष्मी बेकरीवाला, जाकीर बागवान, रिझवान पीओपीवाला, मुजम्मील आसीफ, रिझवान खान नासीर खान, तौसीफ बागवान, गुड्डू बागवान यांच्यासह ६० ते ७० जणांच्या जमावाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम १४४ मधील २,३, ४ अन्वये; कलम ३७ (१) व (३) अन्वये; भादंवि कलम १८८ व २६९ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यातील आसीफ खान हबीब खान (वय ३५, रा उस्मानिया कॉलनी भुसावळ) याला अटक करण्यात आली असून इतरांचा शोध सुरू आहे.

या संदर्भात प्रस्तुत प्रतिनिधीने डीवायएसपी गजानन राठोड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, पोलीस प्रशासनावर मोठा ताण असतांनाही कायदा व सुव्यवस्थेचे पालन करण्यासाठी सर्व जण झटत आहेत. मात्र काही जण बेजबाबदारपणाने वागत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. शहरात कुणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर याच स्वरूपाची कारवाई करण्यात येईल असा इशारा सुध्दा त्यांनी दिला आहे.

Protected Content