भुसावळ, प्रतिनिधी । करोना या विषाणूच्या जागतिक महामारी वर उपाय म्हणजे पौष्टीक आहार, नियमित व्यायाम आणि सर्वांचे महत्त्वाचे व्यक्तीगत स्वच्छता मग ते वारंवार साबणाने हात धुणे,सामाजिक अंतर सांभाळणे, तोंडावर मास्क लावणे,हातावर सॅनिटीझर स्प्रे घेणे आदींचा उपयोग केला जातो. मात्र, व्यक्तीगत स्वच्छतेचा विचार करून ओम सिध्दगुरु नित्यानंद प्रतिष्ठानने एक आगळा वेगळा उपक्रम आज भुसावळ नगरपरिषद संचालित श्री संत गाडगेबाबा महाराज नगरपालिका दवाखान्यात राबविला.
ओम सिध्दगुरु नित्यानंद प्रतिष्ठानतर्फे भुसावळ शहरातील अति गरजू, गलिच्छ राहणारे, इतरत्र फिरणारे माणसे जमा करून त्यांना दवाखान्यात आणण्यात आले. तिथे त्यांना साबण,शॅम्पो ने आंघोळ घालण्यात आली.नंतर सर्वांचे केस आणि दाढी करण्यात आल्यावर सर्वांना भुसावळचे लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या वतीने सर्वांना शर्ट, पेंट भेट देण्यात आली. सर्वांना बिस्कीट पाकीट देण्यात आले. सर्वांना सोबत अंघोळीसाठी साबण, कपडे धुण्यासाठी साबण, तेल,पावडर, दंत मंजन, मास्क, सॅनिटीझर,स्लीपर आदी असे स्वच्छता किट प्रतिष्ठान तर्फे तयार करून वाटण्यात आले. भुसावळ नगरपरिषद दवाखान्यात सर्वांची आरोग्य तपासणी करण्यात आली नंतर परत त्यांना जेवणाचे डबे देण्यात आले . यावेळी विघ्नहर्ता प्रकाशनचे रवींद्र निमानी, डॉ. कीर्ती फलटनकर यांची विशेष उपस्थिती होती. या उपक्रमासाठी केश कर्तनकार मंगेश निकम, रिक्षा वाहक किरण पाटील यांची मोलाची मदत लाभली तर प्रतिष्ठान खजिनदार प्रसन्न पाटील, सदस्य निलेश मालविया, हर्षल बोरनारे,पारस सरोदे ,संदीप चौधरी,राज गुजराती, नासीर याकूब,संजय ठाकूर यांनी उपक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.
प्रशासकीय यंत्रणेचे आभार
भुसावळ ओम सिध्दगुरु नित्यानंद प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. नितु पाटील यांनी या उपक्रमाबद्दल सांगतिले की, स्वच्छता उपक्रम हा आम्ही आज प्रायोगिक तत्त्वावर राबविला होता आणि तो यशस्वी झाला असून आता तो मोठया प्रमाणावर राबविण्याचा मानस आहे.माझ्या सर्व सहकारी मित्रांमुळेच हा उपक्रम उत्तमरीत्या पार पडला.विशेष म्हणजे भुसावळचे लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री रमणजी भोळे यांच्याकडे जेव्हा परवानगी काढायला गेलो तेव्हा लागलीच त्यांनी त्यासाठी आर्थिक मदत करत उपक्रमाला पाठबळ दिले.