सावदा, प्रतिनिधी । रावेर-यावल तालुक्यातील वाहनांना भुसावळ प्रमाणे ४५/- रू. टोल आकारण्यात यावा अशी मागणी स्वच्छ भारत अभियान जिल्हा समन्वयक तथा फैजपूरचे माजी नगराध्यक्ष निलेश मुरलीधर राणे यांनी न्हाईचे चंद्रकांत सिन्हा यांना निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनाचा आशय असा की, नशिराबाद टोल नाक्यावर टोल आकारणी सुरू झालेली असून यात भुसावळ-जळगाव मधील वाहनांना रू. ४५/- प्रमाणे आणि इतर सर्व ठिकाणच्या वाहनांना रू. ८५/- प्रमाणे टोल आकारणी करण्यात येत आहे. वस्तुतः रावेर-यावल तालुक्यातील वाहने ही फक्त भुसावळ-जळगाव याच लांबीतील रस्त्याचा वापर करीत असतांना त्यांना होणारी अतिरिक्त आकारणी अन्यायकारक आहे. नशिराबाद टोल नाक्यावर रावेर-यावल तालुक्यातील वाहनांना भुसावळ प्रमाणेच
रू.४५/- आकारणी व्हावी अन्यथा रावेर-यावल दोन्ही तालुक्यातील जनतेतर्फे उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.