भुसावळ प्रतिनिधी । भुसावळात पुकारण्यात आलेल्या तीन दिवसीय जनता कर्फ्यूला माजी आमदार संतोष चौधरी यांनी विरोध केला असून यावरून आता राजकारण पेटल्याचे दिसून येत आहे.
आज सायंकाळी खासदार रक्षा खडसे व आमदार संजय सावकारे यांनी शहरात १ ते ३ मे दरम्यान तीन दिवसीय जनता कर्फ्यू असेल असे जाहीर केले. हा बंद सर्वपक्षीय असल्याचे याप्रसंगी सांगण्यात आले. तथापि, या बैठकीला अन्य पक्षांचे कुणीही प्रतिनिधी नव्हते. यातच संजय सावकारे यांनी घोषणा केल्यानंतर माजी आमदार संतोष चौधरी यांनी या कर्फ्यूला आपला विरोध दर्शविला. ते म्हणाले की, आधीच लॉकडाऊन सुरू असून कुणालाही विश्वासात न घेता भाजपने जनता कर्र्फ्यूचा निर्णय घेतला असून याला आपला विरोध आहे. जनतेला लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून याचे शहरात पालन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यामुळे आता संतोष चौधरी यांचे समर्थक जनता कर्फ्यूत भाग घेणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्थात, आता जनता कर्र्फ्यूचा मुद्दा राजकीय बनल्याचेही दिसून येत आहे.