शेंदूर्णी प्रतिनिधी | परिसरातील वाढत्या चोरींच्या घटना पाहता पहूर ग्रामीण पोलिसांतर्फे नागरिकांना ध्वनिक्षेपाकाद्वारे भूरट्या चोरांपासून सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
शेंदुर्णी ग्रामस्थांना पहुर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांच्याकडून ध्वनिक्षेपकवरून भुरट्या चोरांपासून सावध राहण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. यात गुरे चोरीच्या, घरफोडी, दुकानफोडी, मोबाईल चोरीच्या घटना घडत आहेत. तरी सावधान राहावे गुरेढोरे रस्त्याकडेला वा रस्त्यावर असुरक्षित बांधू नयेत, ती चोरांकडून सहजगत्या गाडीमध्ये भरली जाऊ शकतात. गुरांच्या गळ्यात घंटी बाधावी, रात्रीतून एक-दोन वेळा उठून गुरे तपासावीत. दुकाने बंद करताना दुकानात एकही रुपया अथवा किंमती वस्तू शिल्लक ठेऊ नये, सोबत घरी घेऊन जावेत. बाहेर गावी जाताना घरी कोणतीही किंमती वस्तू वा रोख रक्कम ठेऊन जाऊ नये, लोखंडी तिजोरीत तर अजिबात नको; कारण चोरांना तिजोरी फोडण्याचे ज्ञान असते. तरी सूचनांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे. आवश्यक मदतीसाठी 9821665693 नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी केले आहे.