पुणे (वृत्तसंस्था) ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगली दौऱ्यावर असताना संभाजी भिडे यांच्या ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’ संघटनेने आज पुकारलेला ‘सांगली बंद’ म्हणजे राजकीय षडयंत्र आहे,’ असा थेट आरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
‘आज के शिवाजी: नरेंद्र मोदी’ पुस्तकाबद्दल भाजपमध्ये असलेल्या शिवरायांच्या वंशजांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी राऊत यांनी केली होती. वादावादीनंतर राऊत यांनी उदयनराजेंकडून वंशज असल्याचे पुरावे मागितले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकारण तापले आहे. राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून साताऱ्यानंतर आज सांगलीत बंद पुकारण्यात आला आहे. परंतू संभाजी भिडे यांच्या ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’ संघटनेने आज पुकारलेल्या सांगली बंदला सुप्रिया सुळे यांनी विरोध दर्शवला आहे. सांगली बंद करणे हे दुर्दैव आहे. छत्रपतींनी मेहनत करुन आदर्श घडवून दिला. गरीब कष्टकऱ्यांचा बाजार बंद करुन सांगलीकरांचे नुकसान केले जात आहे, अशी खंत सुप्रिया सुळे यांनी माध्यमांकडे व्यक्त केली आहे.