जळगाव, प्रतिनिधी | भाषा माणसाच्या जीवन समृद्धतेला एक नवा आयाम देत असते लेखक, विचारवंत, कवी, साहित्यिकानी आपापल्या भाषेतून केलेले लिखाण त्या भाषेची उंची वाढवत असल्याचे मत डॉ. मिलिंद बागूल यांनी व्यक्त केले. ते शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त ज्ञान आणि वाचन यशस्वी जीवनाचा राजमार्ग या विषयावर आभासी पद्धतीने आयोजित व्याख्यानात बोलत होते.
डॉ. मिलिंद बागुल पुढे म्हणाले की, मराठी भाषेने मराठी माणसाची जगाला करून दिलेली ओळख ही सर्वार्थाने गौरव करण्यासारखीच असून भाषेची समृद्धता बोलणाऱ्या, लिहिणाऱ्या, वाचणार्या विचार वाहकावर असते. ज्ञान प्राप्त करण्यासाठी वेळ, काळ याची कोणत्याही प्रकारची मर्यादा नसते. ज्ञानाने आपली ओळख होण्यासाठी आपण ज्ञान मार्गानेच आपल्या जीवनाला प्रगल्भ केले तर समाज आणि देश विकासाला आपली निश्चितच मदत होत असते. आपल्या वाचनातून, लिखाणातून माणुसकीचा विचार दृढ करण्याचा प्रयत्न केल्यास मैत्रीभाव जोपासला जात असतो त्याचे माध्यम भाषा असते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. पराग पाटील म्हणाले की, माणसाने आपल्या भाषेतून व्यक्त होणं ही त्याच्या जीवनाची मोठी उपलब्धी असते. ही उपलब्धी मराठी भाषेतून आपल्याला निश्चितच अनुभवायला येत असते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन यंत्रशास्त्र विभाग प्रमुख तथा मराठी भाषा दक्षता अधिकारी प्रा.डॉ.के.पी.वानखेडे यांनी तर आभार प्रा.डॉ.अविनाश झोपे यांनी मानले.